श्रीरामपूर दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-रेल्वे विभागकाडून आलेल्या नोटीसांमुळे कोणीही विस्थापीत होणार नाही असाच प्रयत्न आपला राहील.यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही सहकार्य घेवून या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
रेल्वे विभागाच्या स्थापत्य विभागाकडून सुमारे एक हजाराहून शहरातील काही रहीवासी आणी व्यापारी यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.मंत्री विखे पाटील आज तालुक्यात आले असताना यासर्व नागरीक व व्यापार्याच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर करून कारवाई थांबविण्याची मागणी केली.भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे सरचिटणीस नितीन दिनकर तालुका अध्यक्ष दिपक पठारे शहर अध्यक्ष मारुती बिंगले गणेश राठी आदी यावेळी उपस्थित होते.
नोटीसा मिळालेल्या सर्व नागरीकांनी मंत्री विखे पाटील यांना निवेदन सादर केले.रेल्वे स्टेशनची झालेली सुरूवात तसेच शहराची झालेली निर्मिती,नागरीकांनी जागा घेवून बांधलेली घर या जागांवर सुरू असलेला व्यापार या सर्व गोष्टी बाबत प्रशासकीय स्तरावर माहीतीबाबत मोठी तफावत असल्याची बाब निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली.
मंत्री विखे पाटील म्हणाले की अचानक हा विषय समोर आला असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही.याजागा नेमक्या कोणाच्या आहेत किती वर्षापासून जागावर कोणाचा अधिकार आहे याची माहीती काढण्याच्या सूचना प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे स्पष्ट केले.
श्रीरापूर रेल्वे स्थानकावरच्या धक्क्याची जागा अनेकदा का बदलली गेली हा प्रश्न आहेच याकडे लक्ष वेधून इथल्या उद्योग वाढीच्या दृष्टीने सुध्दा समस्या आहेत.श्रीरामपूर मधील उद्योग वाढी करीता आवश्यक असलेल्या पूरक बाबी आणण्यासाठी आपले प्रयत्न आहेत.पण कोणाला विस्थापीत करून हे होणार नसल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत या प्रश्नाची चर्चा आपण लगेच करणार असून त्यांच्या सहकार्याने आपल्या सर्वाना दिलासा देण्याचा प्रयत्न होईल असे शेवटी विखे पाटील म्हणाले.




