spot_img
spot_img

कोल्हार भगवतीपूरकरांनी जलजीवनच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना खडसावले

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावांकरिता संयुक्तरीत्या पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ६० कोटी रुपयांचे काम जलजीवन मिशन अंतर्गत सुरु आहे. मात्र सदर काम सुरु असतांना दोन्ही गावातील मुख्य पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले गेले नाही. मनमानी पद्धतीने कामकाज सुरु असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला आहे.
गावकऱ्यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत जलजीवनच्या संबधित ठेकेदार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून खडसावण्यात आले. 
 या विषयासंबंधी कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीदेवी मंदिराच्या भक्तनिवासमध्ये काल शुक्रवारी सकाळी बैठक झाली. गावातील प्रमुख पदाधिकारी, पुढारी, ग्रामपंचायत पदाधिकारी जमले असतांना या कामाचे मुख्य ठेकेदार उपस्थित नव्हते. त्यामुळे अश्याप्रकारे हलगर्जीपणा व ग्रामस्थांना दुर्लक्षित करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. एवढी महत्वाची बैठक बोलावली असतांना निर्णय घेणारा सक्षम व्यक्ती हजर नसल्यास उपयोग काय ? अधिकारी व ठेकेदाराच्या सवडीने बैठक बोलवायची का ? त्यांना वेळ नाही मग गावातील पदाधिकाऱ्यांना दुसरी कामे नाहीत काय ? आजच्या बैठकीत निव्वळ पोकळ आश्वासने मिळणार असतील तर बैठकच रद्द केलेली काय वाईट ? अश्या प्रखर शब्दात उपस्थितांनी ताशेरे ओढले. वातावरण चिघळणार हे लक्षात आल्यानंतर एका उपअभियंत्यांनी मुख्य ठेकेदार अक्षय आडके यांच्याशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला.त्यांना याबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर ते काहीवेळाने बैठकीला हजर झाले. 
 यावेळी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी व ठेकेदार यांना या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित केले. याशिवाय गावातील उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही प्रश्नांची सरबत्ती करून चांगलेच फैलावर घेतले.
 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासंदर्भात कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायतची तक्रार आहे की, गावासाठी जिथे आवश्यक आहे तिथे योजनेच्या ड्रॉईंगमध्ये तरतूद केलेली नाही. त्यामुळे नवीन वाढीव पाईपलाईनसाठी प्रस्ताव देऊन मंजुऱ्या घेण्यात याव्यात. जे काम सध्या सुरु आहे ते काम ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन करावे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला एकदम खेटून पाईपलाईनचे काम केले आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले. लोकांच्या जाण्यायेण्याची गैरसोय झाली. भविष्यात नवीन नळकनेक्शन देण्यात अडचणी निर्माण होतील.
 त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकतांना रस्त्याची हद्द सोडून पाईपलाईन टाकण्यात याव्यात. ज्या रस्त्याने त्यांचे मातीची ने – आण केली जात आहे, ते रस्ते खराब झाले आहेत. ते रस्ते लोकांना जाण्यायेण्याकरीता लगेच दुरुस्त व्हावे यासाठी मुरूम टाकून देण्यात यावा. पाणीपुरवठ्यासाठी सोलरची तरतूद केलेली असली तरी एक्सप्रेस फिडरची नितांत गरज आहे. त्यामुळे एक्सप्रेस फिडरची मंजुरी घेण्यात यावी, जेणेकरून दोन्ही गावांना २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य होईल. अश्या विविध सूचना यावेळी करण्यात आल्या. यावर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे मान्य केले. 
 याप्रसंगी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय खर्डे, उपसरपंच प्रकाश खर्डे, ग्रामविकास अधिकारी एस. जी. कोते, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, गोरक्षनाथ खर्डे, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, रावसाहेब खर्डे, राजेंद्र राऊत, दोन्ही ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी तसेच जलजीवन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता व अधिकारी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!