राहाता दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा):-भारताच्या चांद्रयान-३ चे श्रीहरी कोटा येथून झालेले यशस्वी प्रक्षेपण हे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीचा मोठा अविष्कार असून, विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे द्योतक असल्याचे गौरवोद्गार महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे द्योतक- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत राहाता शहरात या अभियानाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरीकांशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीचे पत्रक त्यांनी नागरीकांना वितरीत केले. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ, कैलास कोते, भाजपाचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, मोहोनराव सदाफळ, दिपक रोहोम, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतिष बावके, प्रदिप बनसोडे, नानासाहेब बोठे, संजय सदाफळ, मेघनाताई दंडवते यांच्यासह शासकीय आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण ही सर्व भारतीयांसाठी मोठी घटना आहे. जगातील अमेरीका आणि रशिया या देशांबरोबरच आता भारताने सुध्दा केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे देश आता बलशाली होत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या टिमने केलेली ही ऐतिहासिक कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविणे हाही विक्रम आज देशाच्या नावावर नोंदला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आता महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे सांगण्यासाठी आता कोणत्या ज्योतीषाची गरज नाही आणि इतर कोणत्याही देशाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. इतर देशाच्या तुलनेत भारत देश आता लष्करी सामर्थ्यामध्येही बलशाली होत असून, मागील ९ वर्षात देशहितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच आता जगात भारताचे महत्व आधोरेखित झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ९ वर्षात केलेली कामगिरी ही संपूर्ण जगासमोर आहे. आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत देशाकडे पाहीले जात आहे. कोव्हीड संकटातही आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून या देशातील जनतेला केंद्र सरकारने आधार दिला. आज समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिला.
योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने केंद्र सरकारची पारदर्शकता जनतेसमोर आली आहे. ९ वर्षात भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर होवू शकला नाही. हाच अभिमान देशवासियांना असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारला आता उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या माध्यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्याने हे सरकार आता वेगान पुढे जात असून, गतीमानतेने निर्णयांची अंमलबजावणी होत आहे.
आजच पशुसंवर्धन विभागाने दूधाच्या दरवाढीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी नेमलेल्या समितीने प्रतिलिटर ३४ रुपये भाव देण्याची केलेली शिफारस मान्य करुन तसा आदेश शासनाने काढला असून, हे सरकार राज्यातील शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.



