कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित वस्तीस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमातेचा नवरात्र महोत्सव सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर लोणी पोलिसांनी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घेतली. यामध्ये भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व सुलभतेने दर्शन घेता यावे या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा होत ठोस निर्णय घेण्यात आले.
भगवतीदेवी मंदिर परिसरात यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत, त्यामध्ये आणखी वाढ करीत आजूबाजूच्या महत्वाच्या ठिकाणी वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले जाणार आहे. याकाळात चोरी, पाकीटमारी होऊ नये याकरिता पोलिसांचे बारीक लक्ष असावे व त्याला आळा बसेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सोयीच्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून भाविकांना विना अडथळा आपली वाहने सुलभतेने उभी करता येतील. यासाठी पार्किंग व्यवस्थेसंबधी चर्चा झाली. मंदिरात भाविकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिस कुमक, होमगार्ड, महिला होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. नवरात्र काळात बरेच स्वयंघोषित स्वयंसेवक मंदिरात येतात आणि नाहक व्यवस्था करण्याचा खटाटोप करतात, त्यांना बंदी घालण्यात आली. नवरात्र पार पडेपर्यंत गावातील ठराविक रस्त्यांच्या मुख्य चौकात वाहतूक पोलिस नेमण्याचे सांगण्यात आले. प्रत्येक दिवशी असणाऱ्या वेगवेगळ्या माळीचे नियोजन केले गेले. नवरात्रीच्या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी आहे. त्यामुळे माळीची मिरवणूक मंदिरात आल्यानंतर केवळ देवीला फुलोरा अर्पण करण्याकरिता दहा मिनीटापुरता गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय दर्शन बारी, घटी बसणाऱ्यांची व्यवस्था वैगेरे विविध बारीकसारीक विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, खजिनदार डॉ. भास्करराव खर्डे, सचिव संपतराव कापसे, माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, विश्वस्त विजय निबे, संभाजी देवकर, लक्ष्मण खर्डे, सर्जेराव खर्डे, सुजित राऊत, वसंत खर्डे, अशोक आसावा, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, गोरक्षनाथ खर्डे, सुखलाल खर्डे, प्रवीण बेंद्रे आदी उपस्थित होते.
गाभाऱ्यात प्रवेश बंदी…नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर भगवतीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गाभाऱ्यात होणारी गर्दी व भाविकांना दर्शन घेतांना लागणारा वेळ, होणारी दाटी या सर्व बाजूंनी सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



