श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – खेळातून समता, बंधुभाव व एकता जोपासली जाते. जिद्द व मेहनत असेल तर यश निश्चित मिळते, याचे असलम इनामदार यांचे आपल्यापुढे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकामुळे तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
आ.कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात एशियन गेम्स २०२३ मध्ये कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील खेळाडू असलम इनामदार यांच्यासह नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्ण व सिल्व्हर पदक मिळविलेल्या खेळाडू व श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुका उपाध्यक्ष सचिन जगताप, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक व माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, माजी नगरसेवक मुख्तार शहा, कलीम कुरेशी, मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष पुरूषोत्तम झंवर, राजेंद्र कोकणे यावेळी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, तालुक्यातून अधिकाधीक खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यासाठी अनेकांनी खेळत सहभाग घेतला पाहिजे. तरूणांनी व्यायाम करावा यासाठी आपण प्रत्येक गावात पाच पाच लाख रुपये खर्चाच्या व्यायामशाळेचे साहित्य देणारा मी एकमेव आमदार आहे. शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहरात दोन मिनी मार्केटसाठीचे प्रस्ताव पाठविले आहेत. दुर्दैवाने क्रीडा संकुलासाठीचे आठ कोटी रुपये अडकले आहेत. त्यासाठी प्रयत्न केला जाईल. शहराच्या बाजारपेठ वाढीसाठी तसेच व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ते सहकार्य करू, असे आश्वासन आ. कानडे यांनी दिले.
यावेळी असलम इनामदार, पुरुषोत्तम झंवर, अंजुम शेख, मुजफ्फर शेख, मुक्तार शहा यांची भाषणे झाली. असलम इनामदार, मर्चंटचे अध्यक्ष झंवर, उपाध्यक्ष स्वरूपचंद खबिया, प्रवीण गुलाटी, संजय कासलीवाल, गौतम उपाध्ये, धर्मेश शहा तसेच बास्केटबॉल स्पर्धेतील १७, १९ व २५ वर्षे वयोगटातील २५ खेळाडु, आणि गरीब नवाज फाउंडेशनचे रज्जाक पठाण व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. तर मुक्तार शहा यांनी आभार मानले.



