नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा): – आशा कर्मचारी तसेच गट प्रवर्तकांची मागणी रास्त असल्याने त्यांच्या संपाला आपला संपूर्ण पाठिंबा असून त्यांच्या संवैधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार युवा नेते उदयन गडाख यांनी व्यक्त केला आहे.
दबावतंत्राचा वापर करत बळजबरी करून घेतले जाणारे ऑनलाईनचे आयुष्मान भारत व काम बंद करावे या प्रमुख मागणीसह गट प्रवर्टकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेस्तोवर त्यांना कंत्राटी (एन.एच.एम.) कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, कंत्राटी कामगारांना लागू असलेली वार्षिक 5 टक्के वेतनवाढ व 15 टक्के बोनस देऊन त्यांना सुट्ट्या मिळाव्या, प्रवास भत्ता वेगळा द्यावा, गट प्रवर्तकांचे संबोधन बदलून त्यांना आशा सुपरवायझर करावे, गट प्रवर्तकांना विना मोबाईल ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नये, आशा कर्मचारी तसेच गट प्रवर्तकांना दिवाळी भेट द्यावी, आशा सेविका आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, आशांना किमान वेतन लागू करावे, आशा कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्यावर दबाव टाकून बळजबरी कामे करून घेण्याचा प्रकार थांबवावा, आशांना दरमहा वेतन देऊन पगार स्लीप देण्याच्या मागण्यांसाठी आशा कर्मचारी व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत.
आशा कर्मचाऱ्यांसह गट प्रवर्तक यांच्या मागण्या न्याय्य असून त्याच्या पूर्ततेसाठी त्यांना संपावर जावे लागते ही बाबच मुळी अयोग्य असल्याची खंत उदयन गडाख यांनी व्यक्त केली आहे. आशा कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी असल्याने व त्यांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने आयुष्मान भारत तसेच गोल्डन कार्ड संबंधित ऑनलाईनची कामे करण्यास बऱ्याच मर्यादा येत असल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तरीही या कामांसाठी त्यांच्यावर सक्ती करणे अमानवी असल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधून आशा कर्मचाऱ्यांची ही अडचण लक्षात घेउन शासनाने या कामांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी गडाख यांनी केली आहे. आशा कर्मचारी तसेच गट प्रवर्तकांच्या सर्व मागण्या रास्त असून शासनाने त्यांच्या सोडवणुकीसाठी अग्रक्रम देण्याची मागणी त्यांनी केली आहे.



