आश्वी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचा अमृत कलश दिल्ली येथे रवाना झाला आहे. मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत आश्वी महाविद्यालय व परिसरातून जमा झालेली माती दिल्ली येथे शहीद वीरांच्या स्मरणार्थ कर्तव्यपथावर बांधण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेला समर्पित होणार आहे. कर्तव्यपथावर या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आश्वी परिसरात अमृत कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित शिंदे व समवेत स्वयंसेवक ऋषिकेश पाबळ, राम खुळे ,प्रमोद दत्तात्रय हे अमृत कलश घेऊन दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुवर्णा जाधव उपप्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य व सर्व प्राध्यापकांनी या अभियानात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत हे अभियान मोठ्या उत्साहाने मागील दोन महिन्यापासून राबविले गेले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील माती या कलशामध्ये एकत्रित केली आहे. त्याचबरोबर माती सोबत एक सेल्फी काढून तो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे.



