शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय जनता पक्षाच्या महाविजय २०२४ उत्तर महाराष्ट्र विभागीय सोशल मीडिया संयोजकपदी प्रविण अलई यांची निवड करण्यात आली आहे.
महाविजय २०२४ अभियान संयोजक श्रीकांत भारतीय यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला एकहाती विजय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली असून या तयारीला “मिशन महाविजय २०२४” असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियाचा वापर आणि प्रचारासाठीचे सहज-सुलभ माध्यम असल्याने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर व्हावा या हेतूने राज्यातल्या २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात वॉर रूम उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारची कामेही लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहेत. दोन्ही निवडणुकात प्रभावीपणे काम करून भाजपच्या विजयाचा शंखनाद करणार असल्याचा विश्वास अलई यांनी व्यक्त केला.
श्री. अलई हे भाजपा सोशल मिडीया सेल चे माजी प्रदेश संयोजक असून प्रदेश प्रवक्ते पदावर ही कार्यरत आहे. अलई यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.



