लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतांना आजच्या कृषि क्षेञाला परंपरागत शेती तंञज्ञानाची जोड देण्याची गरज असून शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यांतूनच जमीनीचे आरोग्य आणि पर्यावरणांचे संवर्धन होईल यासाठी परंपरागत कृषी विकास योजना शेतक-यांनी समजून घ्यावी असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डाॅ.शांताराम सोनवणे यांनी केले.
कृषि विज्ञान केद्र,बाभळेश्वर,आत्मा,अहमदनगर आणि राहाता तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित परंपरागत कृषी विकास योजना याविषयी प्रशिक्षण कार्यक्रमात सोनवणे बोलत होते.यावेळी केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख,पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे,कृषि विस्तार विभाग प्रमुख प्रियंका खर्डे,गृह विज्ञान विभागाच्या संजना लांडे आत्माचे किशोर कडू,राजदत्त गोरे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शांताराम सोनवणे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापन,विविध हिरवळीची खते,गांडूळ खत,जैविक खते आदी विषयी मार्गदर्शन केले. भरत दवंगे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये रोग किड उपाययोजना आणि त्यामध्ये जैविक किटकनाशके, विविध सापळा पिके आदी संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांनी योजनेची माहीती देतांनाच योजनेत शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रियंका खर्डे यांनी मानले.
कृषि विज्ञान केंद्र,१९९३ पासून सेंद्रीय शेती बाबत मृर्गदर्शन करते. प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण दिले जात असल्याने सर्व निविष्ठा उपलब्ध केल्याने आणि वेळोवेळी माहीती दिल्याने परिसरांत सेंद्रीय शेतीकडे शेत-याचा कल आहे.



