सहकार भवन येथे अहमदनगर तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
*जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यासाठी चार हजार कोटी मिळाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील* *कुठलेही टक्केवारी न घेता समान न्यायाने निधी वाटप, हीच विरोधकांची पोटदुखी – खा.डॉ.सुजय विखे पाटील*
अहमदनगर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):- केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जात असून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा साठी आता पर्यंत चार हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे नगर जिल्हयात आता तांडा वस्तीवर हर घर नल, हर नल जल हे पहावयास मिळत असल्याचे सांगताना इतर योजनांचा देखील लाभ तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख कामे करावीत. तसेच शासन आपल्या दारी उपक्रम गावा-गावात राबविण्यात यावा, अश्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्याला ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या गावात कामे सुरू आहेत त्या प्रत्येक गावास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. कामांमध्ये असलेल्या अडचणी व त्रुटी गावकऱ्यांशी संवाद साधून दूर कराव्यात व याबाबतचा अहवाल १५ जुलैपर्यंत सादर करावा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक गावात नागरिकांच्या माहितीसाठी योजनांची माहिती असलेले फलक बसविण्यात यावेत. तसेच ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रस्त्याच्या मधून पाईपलाईन टाकल्याने रस्ते खराब झाले असतील ते रस्ते तातडीने दुरुस्त करून घेण्यात यावेत. योजनेअंतर्गतची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री विखे-पाटील यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व अखंडितपणे विजेचा पुरवठा होण्यासाठी शासनामार्फत विद्युत विकासावरही भर देण्यात येत आहे. ज्या भागात उच्च दाबामुळे रोहित्रावर ताण येऊन वीज वितरणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत अशा ठिकाणची माहिती संकलित करून प्रस्ताव सादर करण्यात यावा. शासकीय जमिनी तसेच खासगी जमिनीवर प्रकल्प उभारणीसाठी जमीन मालकाला मोबदला देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विजेच्या मागणीमधील किमान ४ हजार मेगावॅटची गरज भागेल यादृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी दिल्या.
जमीन मोजणीसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. जमीन मोजणी वेळेत होऊन नागरिकांना नकाशे मिळावेत यासाठी शासनाने रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करत मोजणीही करण्यात येत असून जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली प्रकरणे येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी मोजणीसाठी अर्ज केल्यास १५ दिवसांमध्ये मोजणी होऊन नागरिकांना ऑनलाईन नकाशे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.
सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे शासन आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेणारे देशातील एकमेव असे आपले राज्य आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पीकविमा देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून येत्या काळात पशुधनाला एक रुपयांमध्ये विमाकवच, गुंठेवारी, तुकडेबंदी तसेच शासकीय बांधकामांना वाळू ऐवजी क्रशसॅण्ड वापरण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत शेती व्यवस्था मजबूत करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशाची आर्थिक क्षमता वाढविण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान. देशातील जनतेला मोफत धान्य वितरण केवळ शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच शक्य झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून राज्यात आपले सरकार येताच योजनांचा धडाका सुरू केला आहे, एवढंच नाही तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हा देखील झपाट्याने सुरू असून विविध योजनेचा ग्राम पंचायतीला देण्यात येणारा निधी कुठल्याही टक्केवारी शिवाय दिला जात आहे, या बरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील समान न्याय पद्धतीने सर्वांना निधीचे वाटप केले असून विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. कुठल्याही टक्केवारी शिवाय हा निधी वाटप केला असल्याने विकास कामे ही दर्जेदार करण्याच्या सूचना आपण एजन्सीला दिल्याने ही पोटदुखी असल्याचे त्यांनी सांगितले. अवैध धंद्यांना चाप बसला असल्यानं अनेकांची दुकाने बंद झाली त्यामुळे विनाकारण आरोप करण्याचे काम सुरू असल्याचे खा. विखे यांनी सांगून सर्वसामान्याच्या कामासाठी आपण सदैव तत्पर आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पीकस्पर्धेत यशस्वी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शेतकऱ्यांना बियाण्यांचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनीही आपले विचार व्यक्त केले.
सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.




