नेवासा फाटा( जनता आवाज
वृत्तसेवा ):-आदर्श गाव सुरेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत व सुरेशनगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रथम लोकनियुक्त सरपंच शैलाताई उभेदळ यांचे पती कल्याणराव पा. उभेदळ यांच्या शुभहस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना कल्याणराव उभेदळ यांनी असे म्हटले की आज ग्रामपंचायतच्या वतीने गणवेश वाटप करतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला समाधान लाभले. इथून पुढील काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सरपंच शैलाताई उभेदळ यांच्या माध्यमातून करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व आरोग्याकडेही लक्ष दिले जाईल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत गणवेश दरवर्षी देण्यात येतात यामागे राज्य शासनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची पट संख्या वाढविणे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे आहे. म्हणूनच जिल्हा परिषद शाळेत राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. तसेच प्रसंगी कल्याणराव उभेदळ यांनी असेही आवाहन केले की जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी भरती करावे व आपला भविष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी उपसरपंच भागचंद पाडळे, सुरेशनगरचे माजी सरपंच भगवान दळवी , विनोद निकाळजे, सतीश क्षीरसागर, अशोक खंडागळे, बबन शेटे, हरिश्चंद्र शेळके, भीमा चव्हाण, भाऊसाहेब भोसले, किरण पाषाण, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश उभेदळ, शाळेचे मुख्याध्यापक उदय सर, भगत मॅडम गायकवाड मॅडम आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आल्या बद्दल सरपंच शैलाताई उभेदळ यांचे आभार मानण्यात आले.