लोणी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या ग्रंथाने समाजातील सर्व घटकांना एकत्रित बांधण्याचे मोठे काम केले आहे. संविधानाने प्रत्येक माणसाला मुलभूत हक्क आणि अधिकार मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन साहीत्यिक डॉ राजेंद्र सलालकर यांनी केले.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्रवरा परीवाराच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले.संविधानच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचनही करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे व्हा.चेअरमन सतिष ससाणे संचालक सुभाष तांबे दादासाहेब घोगरे साहेबराव म्हस्के संजय आहेर ज्ञानदेव आहेर कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कामगार याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात प्रा.डॉ सलालकर म्हणाले की,भारतीय इतिहासातील ऐतिहासिक दिवस म्हणून संविधान दिनाची ओळख आहे.याच दिवशी संविधानाचा मसूदा स्विकारला गेलेला दिवस देशात संविधान गौरव दीन म्हणून साजरा करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संविधान ग्रंथाने देशातील सर्व समूहाना एकत्रित गुंफण्याचे मोठे काम केले असून,समाजाची दु:ख, हाल अपेष्टा याची जाणीव असलेल्या आणि मानवी जीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या हातून निर्माण झालेला ग्रंथ ही देशाची शक्ती असल्याचे स्पष्ट करून प्रा.सलालकर म्हणाले की,ज्या परीस्थीतीत भारतीय समाज जगत होता शतकानूशतके ज्या परीस्थीतीशी संघर्ष करीत राहीला आशा सर्व समाजाच्या वेदना बाबासाहेबांनी या ग्रंथाने दूर केल्या.कारण या संविधान ग्रंथाने देशातील प्रत्येक माणसाला संधी दिली.समता बंधूता आणि न्यायचे तत्व दिलेच परंतू प्रत्येक व्यक्तिला स्व:ताच्या हक्क आणि अधिकाराचा अंतर्भाव संविधानात केल्यामुळे या देशातील प्रत्येक समाजघटक स्वाभीमानाने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाने प्रत्येक माणसाला समान हक्क आणि अधिकार दिल्याने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही.त्यामुळेच समानतेचा संदेश देणार्या या संविधान ग्रंथाप्रति प्रत्येक नागरीकाच्या मनात आदरभाव आणि अभिमान असल्याचे सांगतानाच या ग्रंथाची उजळणी सातत्याने झाली पाहीजे असे मत सलालकर यांनी व्यक्त केले.
संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून आता पुढील पंधरा दिवस संविधान पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.या माध्यमातून संविधानाच्या संदेशाचा जागर झाल्यास समाजातील छोट्या घटकाला संविधानातील मूलभूत संकल्पना समजाण्यास मोठी मदत होईल असेही प्रा. सलालकर म्हणाले.
पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध संस्थामध्ये संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न झाले.यासर्व कार्यक्रमास प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.संविधान उद्देशिकचे सामुहीक वाचन करण्यात आले.



