पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ): – काल पारनेर तालुक्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने घातलेले थैमान हे दुखदायक व प्रलयकारी आहे. सातत्याने अस्मानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या मदतीसाठी सरकार तत्पर राहणार असून शेतकऱ्यांनी हवालदिल न होता खंबीररीत्या अनाहूतपणे ओढवलेल्या या अस्मानी संकटाला सामोरे जाणे गरजेचे बनले आहे. माझ्यासह तालुक्यातील सर्वच भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सोबत असून महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कालच जिल्हाधिकार्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.
बळीराजावर आकस्मिकरीत्या कोसळलेल्या या संकटामुळे तालुक्यातील कृषी व्यवसायाच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीकरून शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य श्री.विश्वनाथ कोरडे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राहुल पाटील शिंदे, जनसेवा फौन्डेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सुपा गावचे सरपंच दत्तानाना पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले व स्थानिक पदाधिकारी तालूक्यातील विविध भागांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून आधार देत होते.
शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट हे अस्मानी संकट असून तालुक्यातील सर्व क्षेत्रातील, सर्व पक्षाच्या सर्वच पदाधीका-यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने व एकसंघपणे तालुक्यातील नुकसानग्रस्त बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांना यावेळी केले असून तालुक्यातील शासकीय कर्मचार्यांनी नेमून दिलेल्या कामांत कुठल्याही प्रकारे कसूर न करता आपला कर्तव्याहूनही अधिकचा वेळ या संकटसमयी बळीराजाला सावरण्यासाठी देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून हे संकट फक्त बळीराजावरील संकट नसून हे अखंड तालुक्यावर ओढवलेले संकट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांसह राज्य व केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचा आशावादही भाजपा पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला.



                                    