राहाता दि.२७( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी राहाता आणि संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून सहा तालुक्यातील युवा वारीयर्सशी संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार असल्याची माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून दौरा करीत आहेत.शिर्डी लोकसभा मतदार संघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी राहाता आणि संगमनेर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.आ.बावनकुळे मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील बाळा भेगडे यांच्यासह राज्यातील आणि जिल्ह्यातील भाजपाचे संघटनात्मक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे लंघे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष आ.बावनकुळे यांचे शिर्डी विमानतळावर सकाळी १० वाजता आगमन झाल्यानंतर संगमनेर मध्ये संपर्क से समर्थन अभियानातून विविध योजनांचे लाभार्थी नागरीक यांच्याशी थेट रॅलीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.मालपाणी लाॅन्स येथे संगमनेर अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी शंभर युवा वाॅरिययर्सशी आ.बावनकुळे संवाद साधणार आहे.
दुपारी तीन वाजता राहाता येथे राहाता नेवासा आणि श्रीरामपुर तालुक्यातील युवा वाॅरियर्सशी आ.बावनकुळे यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लोकसभा कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक शिर्डीत सहभागी होणार आहे.



