कोल्हार ( जनता आवाज
वृत्तसेवा ) :- कोल्हार भगवतीपूर येथे चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. तपासकामी पोलिसांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे. याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून येथील शिष्टमंडळाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दरबारी निवेदन दिले.
व्यापारी संघटनेच्या वतीने दिलेल्या या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोल्हार भगवतीपूर येथे गेल्या अनेक वर्षापासून वारंवार होणाऱ्या घरफोड्या, मोटारसायकल चोरी, शेती विद्युत पंप चोरी, मोबाईल चोरी, डाळिंब चोरी अशा अनेक चोऱ्या होऊनदेखील एकही घटनेचा तपास लागलेला नाही. याशिवाय गावात गुंडगिरी, टारगटांचा उपद्रव प्रचंड वाढला असून त्यावर पोलिस प्रशासनाचे कोणताच अंकुश नाही. येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गावाने येथील पोलिस चौकी करिता २० गुंठे जागा दिलेली असताना येथील चौकी कायम स्वरूपी बंद अवस्थेत असते. येथील पोलिसांची संख्याही अपुरी असते. अनेकदा मागणी करूनही यावर कुठलेही ठोस पावले उचलले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शनिवारी कोल्हार येथे एकाच रात्री दोन चोऱ्या होऊन ८ लाखांचा ऐवज लंपास झाला. या घटनेचा आणि येथून मागच्या झालेल्या चोऱ्यांचा तात्काळ तपास करावा. येत्या १० दिवसात कार्यवाही न झाल्यास कोल्हार व भगवतीपूर गाव बेमुदत बंद तसेच रस्ता रोको यासारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उद्योजक अजित कुंकूलोळ, नितीन कुंकूलोळ, सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, दत्तात्रय खर्डे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खर्डे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, महेंद्र कुंकूलोळ, शिवाजी निकुंभ, पांडुरंग राऊत, अर्जुन जाधव, अभय खर्डे आदि उपस्थित होते.