‘शिर्डी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-मध्यप्रदेश राजस्थान आणि छतीसगड मध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेला नेत्रदिपक आणि ऐतिहासिक विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदीर ते राष्ट्र मंदीर या विकास पथावर सुरू असलेल्या कार्याला मतदारांनी पाठबळ दिले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीतील निकालाचा स्पष्ट कौल हाती आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी तीनही राज्यात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष खा.जे.पी.नड्डा यांचे अभिनंदन करून मागील नऊ वर्षात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाच्या त्रिसूत्रीने विकासचा मार्ग सामान्य माणसांपर्यत पोहचविला. राम मंदीर ते राष्ट्र मंदीर या विकास पथावर काम करताना देशाची प्रगती सामान्य माणसाचा विकास याला तीनही राज्यातील जनतेन पाठबळ दिले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आघाडीच्या राजकारणाला जनता थारा देत नाही हे या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिले असल्याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की,व्यक्तिद्वेशा पोटी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्या आघाडीच्या बोलघेवड्या पुढार्यांना या निकालाने मोठी चपराक दिली असून काॅग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेश मध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली योजनांच्या अंमलबजावणीचे महत्वपूर्ण काम झाले तर राजस्थान मध्ये कुशासनाच्या विरोधात सुशासनास मतदारांनी पाठबळ दिल्याचे नमूद करून मध्यप्रदेश मधील योजनांच्या माॅडेलचे अनुकरण इतर राज्यांनी करण्याची अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.