श्रीरामपूर ( जनता आवाज
वृत्तसेवा ) :-जगात सर्वाधिक तीस टक्के युवा शक्ती भारतात असुन आपल्या देशाचा समृद्ध वारसा पुढे चालवीताना प्रत्येकाने राष्ट्र सर्वोपरी ही भावना मनात ठेऊन समाजातील खरे आदर्श दृष्टीत ठेऊन प्रामाणिक देशसेवा करावी, असे आवाहन मुंबई नार्को टेस्ट कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे यांनी केले.
शिवप्रहार प्रतिष्ठानने युवकांसाठी आयोजित केलेल्या करिअर गायडन्स कार्यक्रमात उपस्थित मोठ्या संख्येने तरुणाईला प्रमुख वक्ते म्हणुन मौलिक मार्गदर्शन करताना वानखेडे बोलत होते. व्यासपिठावर शिवप्रहार प्रतिष्ठान चे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरज आगे हे होते . समिर वानखेडे यांचा शिवप्रहारचे चंद्रशेखर आगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तर श्रीरामपूरातील यशस्वी विद्यार्थांचा समीर वानखेडे यांचे हस्ते शाल पुष्प व शिव हिन्दुत्व पुस्तक देवून गौरव करण्यात आला .
पुढे बोलताना वानखेडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आदी आपले आदर्श आणि मानवसेवक डॉ. बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ.अब्दुल कलाम आदी आपले खरे सेलिब्रिटी आहेत.त्यामुळे आपल्याला सेवेतून कोणतेही आव्हानात्मक काम करायला मोठी ऊर्जा मिळते. सत्यकर्म करताना भीती वाटत नाही. सर्वांनी प्रथम राष्ट्र, नंतर संघटना मग आपला स्वतःचा विचार करावा.विद्यार्थ्यांनी बारावी नंतर टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदु आदी दैनिक वर्तमानपत्राच्या वाचनापासून केंद्रीय व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची हळूहळू सुरुवात करावी.ध्येयपूर्तीसाठी झोकुन घेत प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिल्यास हमखास यशप्राप्ती होते असा विश्वासही त्यांनी यावेळी वानखेडे यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत अनेक प्रश्न विचारले असता वानखेडे यांनी उपयुक्त मार्गदर्शन करुन त्याचे अभ्यासपूर्ण निरसन करीत त्यांचे स्वतःचे विविध सेवेतील कडुगोड अनुभव सांगितले. सुरज आगे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वाघ यांनी केले.तर चंद्रकांत आगे यांनी आभार मानले.वानखेडे यांनी श्रीरामपूरचे जागृत दैवत स्टेशन मारुती मंदिरात दर्शन घेअन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच बुद्ध विहार येथे भगवान बुद्धाचे मुर्तीचे पुजन केले.