कोल्हार ( जनता आवाज
वृत्तसेवा ) :- कोल्हार बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र विष्णुपंत खर्डे यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी झाली. यामध्ये साडेसात लाखाचा ऐवज लंपास झाला. घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यामुळे काही रक्कम चोरट्यांच्या तावडीतून बचाचली. गावात आणखी एका ठिकाणी मधुकर बाबुराव साळुंके यांच्या घरातून ६० हजारांची रक्कम लांबविण्यात आली. चोरीच्या या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थ बेमुदत गाव बंद आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. कोल्हार बुद्रुक येथील राजुरी रोडलगत दाट लोकवस्तीमध्ये जितेंद्र खर्डे यांचे निवासस्थान आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूने स्वयंपाक घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर जितेंद्र खर्डे यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. लाकडी फर्निचरचे लॉक असलेले कपाट अलगदपणे उघडले. कुठलाही आवाज होऊ न देता ड्रॉवर उघडले. कपाटातून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोख रक्कम व पाच तोळे सोन्याचे दागिने असा तब्बल साडेसात लाखांचा ऐवज लांबविला.
हा सर्व प्रकार होत असताना श्री. खर्डे तिथेच बेडरूममध्ये झोपलेले होते. कशाचा तरी आवाज ऐकून त्यांच्या पत्नी सौ. वैशाली यांना जाग आली. कपाटाजवळ तोंडाला रुमाल बांधलेला चोरटा त्यांना दिसला. त्यांनी त्याला हटकले असता त्याने त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला. सौ. वैशाली यांनी जितेंद्र खर्डे यांना जागे केले. घरातील लोक जागे झाल्याचे पाहिल्यानंतर चोरी करत असलेल्या चोरट्याने तेथून पळ काढला. एकटा चोर बेडरूममध्ये चोरी करत असताना त्याचे आणखी काही साथीदार किचनमध्ये असावेत. कारण पहाटे उठून पाहिल्यानंतर किचनमध्ये दागिन्यांचे आवरण, अन्य डुप्लिकेट दागिने किचनमध्येच टाकून दिल्याचे आढळून आले.
सकाळी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता रात्री दीड वाजेच्या सुमारास तिघे अज्ञात चोरटे दिसून आले. तसेच रात्री तीन वाजेच्या सुमारास हे चोरटे घरातून बाहेर पडताना दिसतात. एकंदरीत चोरी करण्याची पद्धती पाहता माहितीगार माणसाकडून पाळत ठेवून ही घरफोडी झाली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवाजा उघडण्याच्या पध्दतीवरून चोरटे सराईत असावेत.
दरम्यान काल दुपारी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी श्री. खर्डे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चोरीच्या घटनेबद्दल विचारपूस केली.
ग्रामस्थ बेमुदत गाव बंद आंदोलनाच्या तयारीत…
कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरमध्ये वाढत्या चोऱ्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. आतापर्यंत येथे असंख्य चोऱ्या झाल्या. मात्र एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. याशिवाय मोटरसायकल चोरीच्या घटना ही नित्याची बाब बनली आहे. पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक दिसून येत नाही. अनेक वर्षांपासून मागणी करुनही कोल्हार पोलीस चौकी सदानकदा बंदच असते. वाढत्या चोऱ्यांच्या घटनांचे तीव्र पडसाद उमटू लागले असून ग्रामस्थ मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या चोरीच्या घटनेनंतर काल शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता कोल्हार पोलीस चौकीमध्ये व्यापारी संघटना, ग्रामस्थ व शेतकरी मंचच्यावतीने पोलिस प्रशासनाला गाव बंद आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांनी अत्यंत तीव्र शब्दात पोलिसांच्या कारभाराबद्दल खडक ताशेरे ओढले. लवकरच यासंदर्भात महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे.