शिर्डी, दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिरायती भागाला पाणी देण्याचा दिलेला शब्द पुर्ण झाल्याने आज मोठे समाधान मला आहे. गेली अनेक वर्षे जिरायती भागातील शेतक-यांनी केलेल्या संघर्षाला आता यश आले असून, कालव्यांव्दारे आलेले पाणी लवकरच शेतक-यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
निळवंडे लाभक्षेत्रातील खडकेवाके, खडेकेवाके, देहेगांव, पिंपळस, आडगाव, मिरपुर, लोहारे या गावांमधील सोळा बंधारे आणि सहा पाझर तलावांमध्ये पाणी पोहोचल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जेष्ठ कार्यकर्ते सारंगधर मुरादे, सोसायटीचे चेअरमन रावसाहेब लावरे, जालिंदर मुरादे,लोकनियुक्त माजी सरपंच सचिन मुरादे, सरपंच सौ.संगिता मुरादे, उपसरपंच हिराबाई मुरादे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, तालुका कृषि आधिकारी भोरे, तहसिलदार अमोल मोरे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, गटविकास आधिकारी जालिंदर पठारे, यांच्यासह पंचक्राशितील विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, वर्षानुवर्षे निळवंडेच्या पाण्यासाठी अनेक शेतक-यांनी संघर्ष केला. या गावातील जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव लावरे यांचा उल्लेख करुन पाण्यासाठी संघर्ष करणारा योध्दा म्हणून त्यांनी काम केले. आज या भागात आलेले पाणी पाहण्यासाठी ते आपल्यामध्ये पाहीजे होते. परंतू या सर्वांच्या प्रयत्न आणि संघर्षामुळेच जिरायती भागाला पाणी मिळू शकले. आज कालव्यांव्दारे पाणी या भागात आले असले तरी, भविष्यात आपल्याला ते शेतक-यांच्या बांधापर्यंत घेवून जायचे आहे. यासाठी आता वेगाने काम सुरु करावे लागणार असून, सरकार यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
मागच्या विधानसभा निवडणूकीत आपण निळवंडे धरणाचे पाणी आणणार असा शब्द दिला होता, त्याची पुर्तता आता होत असल्याचे समाधान असले तरी, जेष्ठनेते मधुकरराव पिचड यांचे सहकार्य मिळाल्यामुळेच धरणाच्या पहिल्या २२ कि.मी अंतरावर कालव्यांची कामे सुरु झाल्यामुळेच आज लाभक्षेत्राला पाणी मिळू शकले याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की, याच प्रश्नावरुन विखे पाटील कुटूंबियांची जाणीवपुर्वक बदनामी केली गेली. पाणी आल्यामुळे या बदनामीचा ठपका पुसला गेला. पाणी आल्यामुळे तळे भरले गेले आणि अनेकांची दुकानदारी सुध्दा बंद झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
उजव्या कालव्याची चाचणी लवकरच पुर्ण करुन, उजव्या कालव्यातही पाणी सोडण्याचे नियोजन विभागाने पुर्ण केले असून, त्या भागातील शेतक-यांनाही पाणी देण्याचा शब्द आपण पुर्ण करणार आहोत. परंतू आता जलसंपदा विभागाच्या आधिका-यांना सरसकट पाईप टाकण्याच्या प्रक्रीयेला पायबंद घालावा लागेल. ही परिस्थिती वाढत गेली तर धरणातील पाणी खालच्या भागात येवू शकणार नाही, यातून नवा संघर्ष उभा राहील यासाठी आधिका-यांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मुरादे यांनी केले. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलसंपदा विभागातील सर्व आधिका-यांचा सत्कार करण्यात आला.