अहमदनगर दि. ९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमातून सर्व योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन आज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील साकुरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार रथास पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासामध्ये गरुड भरारी घेतली आहे. देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचून देशाची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. देशाच्या चौफेर विकासाबरोबरच विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम करण्यात येत आहे.
‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातुन सरकारच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यात येऊन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी अधिक जागृतपणे काम करावे, असेही पालकमंत्री श्री विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी राज्यातील 12 कोटी जनतेला पाच लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आलेल्या देशाच्या विविध राज्यातील लाभार्त्यांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचे थेट प्रक्षेपणही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.