कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाचे दर या विरोधात कोल्हार भगवतीपूर येथे नगर-मनमाड महामार्ग अडवून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत रास्तारोको करण्यात आला.
सरकार विरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच्या नेतृत्वात शिवसैनिक कोल्हार येथे तळपत्या उन्हात रस्त्यावर उतरले होते. यावेळी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुका, गांवचे संघटक, नानासाहेब बावके, नितीन औताडे, मच्छिंद्र धुमाळ, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे व मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांनी सरकारच्या धोरणावर तोफ डागत म्हटले की, दूध भेसळ करणाऱ्यांना आधी शिक्षा करा. मग कुणाचीही शेतकऱ्यांच्या दुधात विष काळविण्याची हिम्मत होणार नाही. पापातून जन्माला आलेले हे सरकार आहे. आम्ही मंत्री विखे यांच्या वैयक्तिक विरोधात नाही मात्र जिल्ह्यापासून राज्यात अनेक पदांवर विखेचेच नातेवाईक आहेत. मग तुम्ही शेतकऱ्यांना मदत का करीत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला. प्रथम शिवसेनेनेचं तुम्हाला मंत्रिपद दिले याचा विसर पडून देऊ नका. आम्ही दूध उत्पादक व शेतकरी यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो असल्याचे श्री. खेवरे म्हणाले.
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या दुधाला ३४ रुपये भाव देणार असे सरकार म्हणते मात्र केवळ २८ रुपये दर मिळतो. दूध संकलन करणारे व सरकार शेतकऱ्यांना छळत आहे. शहरातील नागरिकांना खुश ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. दुधातील तफावतीमधील पैसा संस्था चालकांच्या खिशात जात असल्याचा आरोप करीत कांदा निर्यात बंदी व दुध दराबाबत सरकारने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा माजी खासदार वाकचौरे यांनी व्यक्त केली.
यावेळी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गांवामधील प्रमुख, संघटक व मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक रखरखत्या उन्हात सुमारे दीड तास रस्त्यावर ठाण मांडून होते. यावेळी आलेल्या सर्व शिवसैनिकांची व्यवस्था उत्तर जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे यांनी केली होती. यावेळी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रास्तारोको वेळी नगर – मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि युवराज आठरे यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
अन..रास्तारोको मध्ये अडकले शिवसैनिक..!
काल नगर – मनमाड महामार्गावर ठाकरे गटाच्या वतीने सरकार विरोधात आंदोलन व रास्तारोको करण्यात आला. मात्र राहुरीतील अनेक शिवसैनिकांना येण्यास उशीर झाला अन रास्तारोको सुरू झाल्याने लोणी पोलिसांनी वाहतूक बंद केली. मात्र झेंडे व पोस्टर घेऊन येणारे शिवसैनिकांची वाहने कोल्हारच्या पुलावरच अडकली.



