1 C
New York
Saturday, November 30, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोणाला जलनायक,खल नायक व्हायचं होऊ द्या. आपण जनतेसाठी काम करायचे -पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील. निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत आणि निळवंडे पाण्याचे पूजन

संगमनेर दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-अनेक वर्ष ठेकेदारांनी तालुका ताब्‍यात घेतला आहे. ठेकेदारांच्‍या टोळ्यांनीच राजकीय पद घेवून निर्माण केलेली दहशत आता सामान्‍य माणसं संपवतील. या भागात निळवंडे धरणाचे पाणी आले, आता रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपले असून, कोणाला खलनायक, जलनायक व्‍हायचे त्‍यांनी जरुर व्‍हावे पण कालव्‍यांची कामे रखडवून तुम्‍हाला कोणती ‘निर्मिती’ साध्‍य करायची होती हे सुध्‍दा एकदा जनतेला सांगा असे रोखठोक प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

निळवंडे येथे विकसित भारत संकल्‍प यात्रा आणि निळवंडे पाण्‍याचे पुजन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत वारकरी नामदेव पवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. संरपंच सौ.शशिकला पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जेष्‍ठनेते बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष वैभव लांडगे, शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्‍यक्ष अमोल खताळ, अल्‍पसंख्‍याक आघाडीचे जावेदभाई जहागीरदार, हरिषचंद्र चकोर, शरद गोर्डे, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, भाऊसाहेब आहेर, शिवाजी आहेर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धिरज मांजरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्‍यासह विविध विभागांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. विविध योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते मंजुर झालेल्‍या लाभाचे प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्‍यामुळेच तीन राज्‍यातील निवडणूकांमध्‍ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे खुप मोठे आहे. मोदीजींच्‍या नेतृत्‍वावर आणि पक्षावर जनतेने दाखविलेला विश्‍वास अधिक सार्थ ठरवायचा असेल तर, कार्यकर्त्‍यांनी लोकांमध्‍ये जावून योजनांसाठी काम करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

लोकांवर टिका करण्‍यात वेळ घालविण्‍यापेक्षा आपल्‍या कामाच्‍या माध्‍यमातून जनतेपर्यंत पोहोचा असे सुचित करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, योजना केंद्र सरकारच्‍या असतात पण श्रेय दुसरेच घेवून जातात ही परिस्थिती या तालुक्‍याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्‍याण या माध्‍यमातून समाजातील सर्व घटकांना विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आ‍णण्‍याचे काम केले आहे. १०० हून अधिक योजना आज देशभरामध्‍ये सुरु आहे. या योजनांची माहीती देण्‍यासाठी विकसित भारत संकल्‍प यात्रा गावागावात जात असून, २०४७ पर्यंत भारत देश एक विकसित राष्‍ट्र म्‍हणून निर्माण करण्‍याचा संकल्‍पही या निमित्‍ताने होत असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

वर्षानुवर्षे ज्‍या पाण्‍याची प्रतिक्षा आपल्‍याला होती त्‍या निळवंडे धरणाच्‍या कामासाठी महायुतीचे सरकार सत्‍तेवर यावे लागले. यापुर्वी सुध्‍दा युती सरकार असतानाच पहिल्‍या २२ कि.मी अंतरावरील कामाला सुरुवात झाली. लाभक्षेत्रात आज पाणी पोहोचले आहे. याचा सर्वांना आनंद होत आहे. यासर्व कामांचे श्रेय कोणाला घ्‍यायचे ते घेवू द्या, कोणाला जलनायक, खलनायक व्‍हायचे ते होवू द्या त्‍याचे आपल्‍याला काही देणेघेणे नाही. निळवंडे धरणाच्‍या कामाबाबत झालेले राजकारण आता पाण्‍यात वाहून गेले आहे. या भागात आता पाणी आले, पुढचे उदिष्‍ठ आपले रोजगार निर्मितीचे आहे. या भागामध्‍ये कृषिपुरक व्‍यवसाय, महिलांसाठी व्‍यवसायाच्‍या संधी आता याभागात निर्माण करायच्‍या आहेत. स्‍टार्टअप उद्योगासाठी केंद्र आणि राज्‍य सरकार मदत करीत आहे. युवकांसाठी याबाबतचे प्रशिक्षण तसेच सरपंचांना सुध्‍दा विकासाच्‍या आणि योजनांच्‍या अंमलबजावणीचे मार्गदर्शन होण्‍याकरीता कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

राज्‍यात ट्रि‍पल इंजीन सरकार आहे. निधीची कमतरता भासणार नाही. कोणी कितीही अडथळे निर्माण केले तरी, या तालुक्‍याची विकास प्रक्रीया आता थांबणार नाही. हा तालुका केवळ ठेकेदारांच्‍या दावणीला बांधला गेला आहे. ठेकेदारांच्‍या टोळ्यांनी निर्माण केलेली दहशत सामान्‍य जनताच आता मोडुन काढेल असा सुचक इशारा देवून ना.विखे पाटील म्‍हणाले की, मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्‍यांची कामे जाणीवपुर्वक यांनीच रखडविली होती. या कालव्‍यांच्‍या कामाचा ठेका कोणाकडे होता हे जनता जाणून आहे. परंतू केवळ अडवणूक करण्‍याच्‍या कारणाने ‘निर्मिती’ कंपनीचा ठेकेदार संपूर्ण विभागालाच वेठीस धरीत होता. मात्र सरकार बदलल्‍या नंतर ही कामे सुरु झाली. कालव्‍यांची कामे रोखून तुम्‍हाला कोणती ‘निर्मिती’ साध्‍य करायची होती हे सुध्‍दा निळवंड्याचे श्रेय घेणा-यांनी सांगावे असा टोलाही ना‍.विखे पाटील यांनी लगावला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!