सातारा (जनता आवाज वृत्तसेवा):- साताऱ्यामध्ये भाजपचे खासदार व आमदार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाद हे पराकोटीला गेले आहे. याचेच उदाहरण म्हणजे भाजपचे खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला. तरीदेखील उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमीपूजन केले. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमने-सामने आले असून त्यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात भाजप खासदार व आमदाराची कृषी बाजार समिती च्या भूमिपूजनावरून जुंपली
सातारा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या खिंडवाडी येथील नूतन जागेचे भूमिपूजन आज आमदार शिवेंद्रसिंहराजे करणार होते. मात्र, त्यापूर्वीच उदयनराजेंचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून तेथील साहित्य फेकून दिले. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे यांनीही थोड्याच वेळात तेथे हजेरी लावली.
उदयनराजेंच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळावरील एक कंटेनर उलटा करुन टाकला. या घटनेमुळे साता-याच्या दाेन्ही राजांमध्ये (उदयनराजे आणि शिवेंद्रराजे ) आगामी काळात जोरदार खडाजंगी हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी (कणसे ढाब्या शेजारी) येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन होणार होते. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमापूर्वी काही ग्रामस्थ व समर्थकांनी येथे पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच, कंटेनर पलटी केला. पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाजवळच सातारा मार्केट कमिटीची खिंडवाडी येथे जागा आहे. येथेच हा प्रकार घडला. असा प्रकार जर चालू राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या वादाचा फटका भाजपला बसू शकतो. योग्य वेळेमध्ये भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी याच्यात दखल घेऊन या दोन्ही नेत्यांची मधील वाद संपुष्टात आणावा.
सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले हे समर्थकांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलिस फौजफाटाही बोलावण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाला बाजूला केले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
साताऱ्यामध्ये आमदार व खासदार हे भाजपचे असून हे दोघेही तुल्यबळ असून दोन्ही राजघराण्याचे वंशज असल्यामुळे यांना मानणारा समुदाय मोठा आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्यामध्ये राजकारणात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे यापुढील काळातही दोघांमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह दाट आहे.