25.1 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हारच्या दळभद्री बस स्थानकाचे रुपडे पालटले…

कोल्हार ( जनता आवाज
वृत्तसेवा  ) :- अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेल्या कोल्हार बुद्रुक येथील दळभद्री अवस्थेतील बस स्थानकाचे रुपडे पालटले आहे. अनेकदा मिन्नतवाऱ्या करूनही संबधित विभाग दखल घेईना. शेवटी याकामी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून बस स्थानकाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला.
 निर्मितीपासूनच कोल्हारचे नवीन बसस्थानक वादाच्या भोवऱ्यात सापडले. उभारणीत चुकीची रचना. निकृष्ट दर्जाचे काम. आवारातील उखडलेले डांबरीकरण. महाकाय खड्डे. त्यामुळे नशिबी आलेले धुळीचे साम्राज्य. प्रचंड अस्वच्छता. स्वच्छतागृहांची अत्यंत घाणेरडी स्थिती. साहित्याची मोडतोड करणाऱ्या विघ्नसंतोषी टारगटांचा नित्याचा उपद्रव. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांचे व नशा करणाऱ्या बहाद्दारांच्या बैठकीचे बनलेले हक्काचे ठिकाण. काही बसेस आवारात येत नसल्याने प्रवाश्यांची होणारी पळापळ. बैठकव्यवस्थेअभावी प्रवाश्यांना बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागण्याची शिक्षा. अर्थात पूर्वी बसण्यासाठी बाकडे होते मात्र विघ्नसंतोषी लोकांच्या डोळ्याला तेदेखील खुपले. त्या बाकड्यांचीही तोडफोड करण्यात आली. तुटलेल्या फरश्या. खराब झालेले रंगकाम. ठिकठिकाणी जाळेजळमाटे. अश्या एक ना अनेक कारणास्तव हे बस स्थानक कायम चर्चेत राहिले. असून अडचण अन नसून खोळंबा अशी अवस्था झालेली होती. 
 येथून मागे बसस्थानकाची दुरावस्था दूर व्हावी म्हणून प्रयत्नही झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयाशी अनेकदा पत्रव्यवहार झाले. व्यथा मांडण्यात आल्या. मात्र त्यास कायम केराची टोपली दाखविण्यात आली. जिथे जमेल तिथे गाऱ्हाणे मांडले परंतु त्याकडे सर्वांनी कानाडोळा केला. वृत्तपत्रांमधून असंख्यवेळा प्रखर लिखाण झाले. पण लेखणीने निब्बरगट्ट कातडी हलली नाही. काही वर्षांपूर्वी येथील सुसंवाद मंच आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या सहकार्याने बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण केले. प्रवाश्यांना बसण्यासाठी बैठकव्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची सोय केली. मात्र कालांतराने बसस्थानक पूर्वस्थितीत पोहोचले. रात्रीस खेळ चाले म्हणून मध्यंतरीच्या काळात कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने लायटींग व्यवस्था करून दिली. आवारात मोठमोठे खड्डे झाले म्हणून मुरून टाकून दिला.
 कोल्हार बुद्रुकसारख्या नामांकित बाजारपेठेच्या गावाला हे शोभणारे नाही. बसस्थानकाची अवस्था बदलावी अशी अनेकांची मागणी होती. कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी याकामी पुढाकार घेतला. लोकसहभागातून बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्याचे ठरले.
त्याअनुषंगाने संपूर्ण बसस्थानक पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण बसस्थानकाला नवीन रंगरंगोटी करण्यात आली. आवारातील झाडांच्या खोडांना रंगविण्यात येणार आहे. तुटलेल्या फरश्या बदलायला सांगितल्या. स्वच्छतागृहाची दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. लवकरच श्रीरामपूर येथील एका देणगीदाराकडून प्रवाश्यांना बसण्यासाठी वीट बांधकामातून बैठकव्यवस्था केली जाणार आहे. एकंदरीत बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलविण्याचे काम वेगाने सुरु आहे.
आता प्रश्न उरतो डांबरीकरणाचा…
एवढे सगळे झाले तरी बस स्थानक आवारातील उखडलेले डांबरीकरण आणि खड्ड्यांचा प्रश्न उरतो. उखडलेल्या डांबरीकरणामुळे धुळीच्या फुफाट्याला सोसावे लागते. मध्यंतरी येथील व्यापारी संघटनेच्या एका कार्यक्रमात महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बस स्थानक दुरुस्तीसाठी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु त्याचे पुढे काय झाले ? माहित नाही. पाठपुरावा करण्यात ग्रामस्थ कमी पडले की काय ? माहित नाही. तो निधी मिळाला तरी येथील डांबरीकरणाचा प्रश्न निकाली निघू शकतो.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!