नाशिक( जनता आवाज वृत्तसेवा) :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
केंद्रीय युवक कल्याण क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक येथे आजपासून सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज दुपारी तपोवन मैदानावर झाले. त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध राज्यांच्या संघांनी पथसंचलन केले. तसेच ‘विकसित भारत @2047- युवा के लिए- युवा का द्वारा’ या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रम, सामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब तयार होत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील २५ वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा, त्यासाठी युवकांनी संकल्प सोडावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी मेरा भारत- युवा भारत संघटन सुरू करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त युवक- युवतींनी नोंदणी केली आहे.
आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटी, एनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. महामार्गांची निर्मिती, वंदे भारत रेल्वे, विमानतळांचाही विकास करण्यात येत आहे. चंद्रयान, आदित्य एल १ च्या यशाने जगाला भुरळ पडली आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिली आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदान करावे, असेही आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.
मराठी भाषेतून राजमाता जिजाऊ यांना वंदन राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हाच धागा पकडत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मराठीतून संवाद साधत अभिवादन केले. ते म्हणाले की, भारतीय नारी शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी युवा महोत्सवामुळे मिळाली याचा अतिशय आनंद होत आहे. राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी वंदन, असे सांगितले. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राची भूमी ही पुण्य, वीर तपोभूमी आहे. याच भूमीत राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा महानायक घडविला. याच भूमीत अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, रमाबाई आंबेडकर, चाफेकर बंधु, दादासाहेब पोतनीस यांच्या सारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे घडली, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले._ तीर्थक्षेत्रांची करावी स्वच्छता अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त आबालवृध्दांनी या कालावधीत मंदिरांसह तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी काळाराम मंदिरात दर्शनानंतर स्वच्छता करण्याची संधी मिळाल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.
अद्वितीय कामगिरीची नोंद युवकांनी अद्वितीय कामगिरी बजवावी. या कामगिरीची समाज नेहमीच दखल घेतो. एवढेच नव्हे, तर इतिहासात या कामगिरीची सुवर्णाक्षकरांनी नोंद होते. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद ही त्याचीच उदाहरणे आहेत. तसेच देशातील प्रत्येक महिलेचा सन्मान करीत व्यसनांपासून तरुणांनी दूर राहावे, असेही आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली आहे. कुंभमेळा करिता नाशिक प्रसिद्ध आहे. अशा या भूमीत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त देशभरातील युवक शक्ती एकत्र आली आहे. यानिमित्त येथे युवकांचा कुंभमेळाच भरला आहे. ही राज्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या क्रीडा महोत्सवाचे बोधचिन्ह राज्यातील भीमाशंकर, महाबळेश्वर आणि आंबा घाटाच्या जंगलात आढळून येणारा शेकरू हा अतिशय सुंदर प्राणी आहे. तो गतिशीलता, चपळता, विविधतेचे आकर्षण असणारा आणि पर्यावरणा प्रती सजग असलेला प्राणी आहे. त्यामुळे या बोधचिन्हातून तरुणांना मैत्री, सामजिक एकतेचा संदेश देतो. हा संदेश देशभरातील तरुण नाशिक मधील युवा महोत्सवातून आपापले राज्य, शहर आणि गावात घेऊन जातील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताची जडणघडण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महोत्सवासाठी आलेल्या तरुणांना शुभेच्छा दिल्या. युवकांच्या सक्रिय सहभागामुळे सन २०४७ पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवतील, असा मला विश्वास आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे नाव जगात आदराने घेतले जात आहे. भारताची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. त्यामुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील तरुणांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. ठाकूर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात यशस्वी होत आहे. क्रीडा, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे. वीज, लोखंड उत्पादनात आघाडी घेतली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच शंभरावर पदके पटकावली आहेत. भारताने आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र आणि वैभवशाली, समृध्द भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले. त्यासाठी युवकांनी सहकार्याचा संकल्प सोडावा, असेही आवाहन मंत्री श्री. ठाकूर यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी केला सत्कारप्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा सत्कार केला. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. पवार यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा सत्कार केला.