राशीन ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्जत तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमादरम्यान २२ जानेवारी रोजी होणारा प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा एकट्या भाजपाचा नसून हा सर्व भारतीयांचा सोहळा आहे असे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
ते राशीन येथील आयोजित कार्यकामाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी शहाजीराजे भोसले,देशमुख साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले की, प्रभू श्रीरामांचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा करावा याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटप करण्यात येत आहे. या साखर व चना डाळीचे दोन लाडू बनवून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, साखर वाटपावर काही विरोधक टीका करत असतात. त्या सर्व टीकाकारांना माझे एकच सांगणे आहे, मी चार किलो साखर वाटप करत आहे; तुम्ही पाच किलो करावी असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले, भारतात सुजय विखे पाटील हे एकमेव असे खासदार असतील ज्यांनी हा उपक्रम आपल्या नगर जिल्ह्यात राबवला आहे. हे नगर जिल्ह्याचे मोठे भाग्य आहे की सुजय विखे हे खासदार म्हणून जिल्ह्याला लाभले आहेत. शिवाय विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी आजवर कर्जत तालुक्यासाठी भरीव निधी देखील उपलब्ध करून दिला आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
यासोबतच अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. याबाबतही त्यांनी नागरिकांना माहिती दिली. या स्पर्धेच्या अंतर्गत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी सुंदर असे उपक्रम राबवून रांगोळी, सजावट, देखावा, चित्र साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राबविलेल्या उपक्रमाचा फोटो तसेच सदरील उपक्रमासोबत आपला सेल्फी असे दोन छायाचित्र आपल्या तालुक्यासाठी देण्यात आलेल्या ७३८७१४००८५ या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक असणार आहे. तसेच आपले नाव, गाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देखील यामध्ये असणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धकाने राबविलेल्या उपक्रमाचा फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून @drsujayvikhe या अकाउंटला टॅग केल्यास अतिरिक्त गुण देखील मिळणार आहेत. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी असणार आहे. या स्पर्धेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामधून एक विजेता तर शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून एक विजेता निवडण्यात येणार असून या विजेत्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन सुजय विखे यांनी नागरिकांना केले आहे.