लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे ४८वे संम्मेलन छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास आणि गड किल्लाची माहिती देत साजरा करतांनाच किल्ल्यांचा इतिहास सादर करत रंगतदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असताना संपूर्ण वातावरण हे शिवमय झाले होते.
स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ.अर्चना चोरडिया- बिरनाले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिताताई विखे पाटील,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,संस्थेचे संचालक पोपटरिव वाणी, प्रवरा गर्ल्स स्कुलच्या प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी, व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ. ललिता आहेर , वैजयंता भालेराव व सौ. सीमाताई मैड, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डाॅ.बेलमिन रोजमीन, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या भारती कुमकर , पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूलचे कर्नल जोशी ,सौ. दिघे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री तांबे , प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका जसौ अनिता घोगरे व कार्यक्रमाच्या समन्वयक सौ .विजया वाघ आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील वार्षिक अहवालाचे वाचन व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी शाळेने राबवलेले विविध उपक्रम ,आंतर शालेय व आंंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाच्या निकालाचा गोषवारा शाळेच्या प्राचार्या सौ. रेखा रत्नपारखी यांनी सविस्तरपणे सांगितला.
स्नेहसंमेलनाच्या प्रमुखा अतिथी अर्चना चोरडिया यांनी शालेय जीवनाचा आनंद घेत असताना जीवनात मूल्यांचे महत्त्व जाणावे व यशाची गुरुकिल्ली कोणती ते सांगितले. तर
सौ .शालिनीताई विखे पाटील यांनी स्पर्धेच्या युगात मुलींसाठी इंग्रजी शिक्षणाचे महत्व व ग्रामीण भागात सर्वांगीण विकास साधणे याबाबत मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत तसेच इतर इयत्तेतील गुणवंत विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नामांकित शाळा अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी मधून विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या कु. पवार गायत्री काशिनाथ हिने महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक तर कु. सूर्यवंशी पूजा बकाराम हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक व कु.महाले पूजा दिगंबर हिने पुणे बोर्ड तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच इयत्ता बारावीची कु.पवार दिपाली कैलास हिने विज्ञान शाखेत पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता दहावीची आदर्श विद्यार्थिनी कु.सिद्धी घोगरे व कु. रोहिणी भोये व इयत्ता बारावीची कु. पल्लवी खंडागळे यांना मिळाला. तसेच या वर्षीचा’ बेस्ट हाऊस’ पुरस्कार ‘लता मंगेशकर’ हाऊसला मिळाला.
वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम “निश्चयाचा महामेरू- कृतदुर्ग” ही होती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला रायगड किल्ल्यावरील ‘शिवराज्याभिषेक’ सोहळा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. तसेच शिवनेरी, प्रतापगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड इ. किल्ल्यांचा इतिहास सादर करत रंगतदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असताना संपूर्ण वातावरण हे शिवमय झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका सौ. अनिता गोरडे यांनी आभार प्रदर्शन केले.