18.7 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात करू साजरा -स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- येत्या २२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित श्रीराम मंदिराचे उद्घाटन व प्रभू श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. २२ जानेवारीचा हा दिवस संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक व आनंदाचा दिवस असून,घरोघरी रांगोळी काढून, श्रीराम दीप लावून, गोडधोड जेवण करून भक्तिभावाने दिवाळीसारखा हा सोहळा जल्लोषात साजरा करू. या दिवशी श्रीराम नाम संकीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम संस्थेच्या वतीने येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यभर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (१९ जानेवारी) कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते भागीनाथ गायकवाड, अनिल भोकरे व संदीप शिरसाट यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रदान करण्यात आल्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते कारसेवक लक्ष्मणराव भोकरे व बाळासाहेब कदम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रभू श्रीराम व अयोध्येतील श्रीराम मंदिराचे सुंदर छायाचित्र असलेले सन २०२४ चे कॅलेंडर श्रीरामभक्तांना वाटप करण्यात आले. यावेळी ‘अनुलोम’ संस्थेच्या सुनंदाताई आदिक, ह. भ. प. दादा महाराज टुपके, बाळासाहेब कदम, कारसेवक लक्ष्मणराव भोकरे, माधवराव रांधवणे, सुभाष कानडे, रंजन साळुंके, भाऊसाहेब शिरसाट, सुदाम कोळसे, जनार्दन शिंदे, बबनराव साळुंखे, कैलास हुसळे, सुरेश कानडे, सुभाष शिरसाट, जनार्दन शिंदे, अशोक बनकर, रवींद्र रांधवणे, रमेश नारायण रांधवणे, मथुराताई दिघे, संदीप शिरसाट यांच्यासह श्रीरामभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक वाल्मीकराव भोकरे तर सूत्रसंचालन ‘अनुलोम’ संस्थेचे सागर करडे महाराज यांनी केले. मथुराताई दिघे यांनी स्नेहलताताई कोल्हे यांचा तर प्रतिभाताई कानडे यांनी सुनंदाताई आदिक यांचा सत्कार केला.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, तब्बल पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर असंख्य कारसेवकांच्या बलिदानामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नामुळे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्याचे तमाम श्रीरामभक्तांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणार असून, रामलल्लाचा हा अभूतपूर्व प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे हे आपले परमभाग्य आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू-संत-महंतांबरोबरच आपल्या भागातील सदगुरू प. पू. रामगिरीजी महाराज, प. पू. रमेशगिरीजी महाराज यांना निमंत्रित करण्यात आले आहे, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची व अभिमानाची गोष्ट आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरुपात होणार आहे. कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातही प्रत्येकाने प्रभू श्रीरामाचे गुणगान गात वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद द्विगुणित घ्यावा.

‘राम’ या नावात फार मोठी ताकद आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून, ते केवळ भारताचे नाहीत तर संपूर्ण विश्वातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. जगभरात भारताचे नाव उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मनिष्ठा व राष्ट्भक्ती जपत देशातील जनता हेच आपले कुटुंब मानून समर्पित भावनेने अहोरात्र देशसेवा करीत आहेत. मोदीजींना आपण सर्वांनी खंबीर साथ दिली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ‘अनुलोम’ संस्थेने जनसामान्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवून अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळवून दिला असल्याचे सांगून फडणवीस यांनी ‘अनुलोम’ संस्थेमार्फत गावोगावी श्रीराम मूर्ती प्रदान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ह.भ. प. दादा महाराज टुपके, सागर करडे यांचीही भाषणे झाली. अनुलोम संस्थेच्या सुनंदाताई आदिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनुलोम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. स्नेहलताताई कोल्हे यांनी श्री गणेश, श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!