मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या महाराष्ट्राचे राजकारण अजितदादा भोवती फिरते. त्यातच दीपक केसरकर यांनी अजित दादांना दिलेल्या ऑफरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळी चर्चा चालू झाली.
अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय- खा.सुप्रिया सुळे
अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर आज प्रथमच सुप्रिया सुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली.
अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर आज शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर सुप्रिया सुळेंनी मिश्कील टिप्पणी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी दीपक केसरकरांच्या ऑफरवर भाष्य केले.