लोणी दि.१६( जनता आवाज
वृत्तसेवा ):-माझ्या जीवनाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यामध्ये माझ्या आई-वडिलांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अनमोल आहे. माझ्या आई-वडिलांनी शेतकरी असताना देखील कठीण परिस्थितीतून मला चांगले शिक्षण देण्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीची जाणीव मला पदोपदी असल्याने मी यूपीएससी परीक्षेमध्ये मेरिटमध्ये पास होऊ शकलो अभ्यास करताना अनेकदा आपणास ही परीक्षा पास होणे अशक्य असल्याचे वाटत होते परंतु आई-वडील घेत असलेली मेहनत डोळ्यासमोर आल्यानंतर मी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने यूपीएससी परीक्षा मेरिटमध्ये पास झालो .विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये मेहनत ,संयम ,वक्तशीरपणा अंगीकारल्यास यश नक्की मिळते असे सागर खर्डे यांनी प्रतिपादन केले .
लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार येथे गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण श्री सागर यशवंत खर्डे बोलत होते.
प्रवरा सहकारीबॅकेचे अध्यक्ष आणि स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील यांच्या शुभहस्ते गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेची माजी विद्यार्थिनी धनश्री असावा हिने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळविले त्यासाठी तिचा सत्कार करण्यात आला तर वैष्णवी मापारी या विद्यार्थिनीची टाटा कन्सल्टन्सी सोल्युशन या कंपनीमध्ये निवड झाली त्याबद्दल तिचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर भास्करराव खर्डे म्हणाले की तुमच्यासमोर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी परंपरा निर्माण केलेली आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता .शाळेने तुम्हाला उत्तम शालेय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . या सुविधेचा प्रत्येक विद्यार्थ्याने जास्तीत जास्त लाभ घेतल्यास यश मिळाल्याखेरीज राहणार नाही . विद्यार्थ्यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना आदर्श म्हणून नजरेसमोर ठेवावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य श्री सुधीर मोरे यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कारमूर्तींची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी दांडगे आणि सृष्टी पूर्वे कुऱ्हे या विद्यार्थिनींनी केली तर स्मरणिका दळे हिने सर्वांचे आभार मानले . कार्यक्रम प्रसंगी प्रवरा बँक लोणी संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्र राऊत व सौ अर्चना खर्डे यांचा देखील सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांचा सत्कार भगवती माता देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री भाऊसाहेब खर्डे पाटील ,श्री साहेबराव दळे पाटील श्री संभाजी देवकर यांचे हस्ते करण्यात आला .कार्यक्रम प्रसंगी श्री अशोक शेठ असावा सुनील शिंदे ,विजय निबे, चंद्रभान खर्डे पाटील ,सर्जेराव खर्डे पाटील, जनार्दन खर्डे पाटील, लक्ष्मण खर्डे पाटील उपस्थित होते.