कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- अयोध्येच्या रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य-दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होवून अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू श्रीराम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला सोमवार (दि.२२) रोजी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला मतदार संघातील नागरिकांनी प्रतिसाद देत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामाची महाआरती करून श्रीराम भक्तांना श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
श्रीराम भक्तांनी पाहिलेले स्वप्न पाच शतकानंतर सोमवार (दि.२२) पूर्ण झाले असून अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. या सोहळ्याची आ. आशुतोष काळे यांनी देखील जय्यत तयारी करून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणाऱ्या साधू संतांच्या पूजन कार्यक्रम प्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबर आपल्या दारासमोर श्रीराम दीप लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार मतदार संघातील प्रत्येक गावात विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रभू श्रीरामाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येवून महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या विविध गावातील श्रीराम भक्तांनी काढलेल्या पालखी सोहळ्यात व मिरवणुकीत आ. आशुतोष काळे सहभागी झाले होते. कोपरगाव शहराच्या बेट भागातील शुक्राचार्य मंदिरात त्यांनी सामुहिक रामरक्षा स्तोत्र पठन केले. कोपरगाव शहरातील विविध चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या त्या ठिकाणी जावून पूजन केले.तसेच कोपरगाव शहरातील कार सेवकांचा सत्कार केला. कोपरगाव शहरातील बाजार तळावरील जलाराम मंदिरात व श्रीराम मंदिरात आ. आशुतोष काळे यांनी पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या समवेत सपत्नीक महाआरती करून कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या बाबतीत समृद्ध करण्यासाठी प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले.