कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात गंगा गोदावरी महाआरती, भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड म्युझिकल शो झाला. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व असंख्य श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात गंगा गोदावरी महाआरती केली. कोपरगावच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ झालेला हा अपूर्व व नयनरम्य सोहळा ‘याची देही,याची डोळा’ पाहण्यासाठी श्रीराम भक्त व नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगावकर व सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (२२ जानेवारी) सायंकाळी पवित्र गोदावरी नदीकाठी गंगा गोदावरी महाआरतीचा भव्य-दिव्य नेत्रदीपक कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, रेणुकाताई कोल्हे यांनी श्रीरामाचा गजर करीत प्रचंड संख्येने जमलेल्या भाविकांच्या उपस्थितीत गंगा गोदावरी मातेची महाआरती केली व सर्वांना श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. श्रीराम जय राम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय, हर हर गंगे, हर हर महादेव, गंगामैय्या की जय, गोदावरी माता की जय अशा विविध घोषणांनी संपूर्ण गोदाकाठ व कोपरगाव नगरी दुमदुमली होती. आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी व आसमंत दुमदुमून टाकणारा प्रभू श्रीरामाचा जयघोष यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. यावेळी शेकडो दीप प्रज्वलित करून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. गंगा गोदावरी महाआरतीच्या निमित्ताने संपूर्ण गोदाकाठ परिसर दिव्यांनी व विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
गंगा गोदावरी महाआरतीनंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर झालेल्या भजन संध्या कार्यक्रमात ‘आस्ते कदम’ फेम गायक ऋषिकेश रिकामे, ‘सारेगम लिटिल चॅम्पस-२०२३’ ची विजेती गायिका गौरी पगारे, ‘इंडियन आयडॉल’ फेम गायिका सुरभी कुलकर्णी, भाग्यश्री टिकले, ‘सुपरस्टार सिंगर’ विजेता चैतन्य देवढे (माऊली) यांनी आपल्या सुरेल व जादुई आवाजात प्रभू श्रीराम यांचा महिमा सांगणारी अनेक कर्णमधुर गीते व भजन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राम सियाराम जय जय राम सियाराम, आज अयोध्या सजली, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, आई माझी कोणाला पावली, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आये है, अवध में राम आये है, रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा यासारख्या विविध गीतांची बरसात करून त्यांनी वातावरण भारावून टाकले होते. श्रीराम भजन व विविध भक्तिगीतांमुळे उपस्थित सर्व भाविक-भक्त भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. याप्रसंगी सर्व गायक कलाकारांचा विवेकभैय्या कोल्हे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विनोदी कलाकार संदीप जाधव व मनसेचे संतोष गंगवाल यांनी केले. नंतर झालेल्या लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड शोमुळे उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहर व परिसरात श्रीराम मंदिर व अन्य ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी श्री विघ्नेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, श्री दत्त पार, श्री जलाराम मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर,
श्री शुक्लेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री साईबाबा मंदिर, गुरुदत्त मंदिर आदी विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन भाविकांना प्रसाद वाटण्याची सेवा केली व सर्व श्रीराम भक्तांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सुशांत खैरे व परिवार, चिकटे गल्ली, रचना पार्क, हनुमाननगर, आदर्श युथ क्लब, दिगंबर जैन समाज, गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशन, अंबिका तरुण मंडळ आदींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेटी देऊन प्रभू श्रीरामांची महाआरती करून मनोभावे दर्शन घेतले. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते भाविकांना बुंदी प्रसाद वाटप करण्यात आला. स्नेहलताताई कोल्हे यांनी इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेच्या वतीने नारायणशेठ अग्रवाल, माधवराव देशमुख, अजय गांधी, घुमरसेठ, श्याम डागा, बळीराम साटोटे, अशोक नरोडे, राहुल साटोटे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात श्रीरामभक्तांना प्रसादाचे वाटप केले.
विवेकभैय्या कोल्हे यांनी धरला ठेका भजन संध्या कार्यक्रमात ‘रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी’ या सुरभी कुलकर्णी हिने गायिलेल्या गीतावर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह उपस्थित श्रीरामभक्तांनी ठेका धरला. यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. विवेकभैय्यांनी कार्यकर्त्यांसमवेत बहारदार नृत्य करून कार्यकर्त्यांचा व श्रीरामभक्तांचा आनंद द्विगुणीत केला.