लोणी दि.१५ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करताना लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते दिव्यांगाना मदत निधी तर अंगणवाड्याना भांडी वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसोबा मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाच टक्के दिव्यांग निधीतून ९४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये प्रमाणे २ लाख ८२ हजार रक्कमेच्या मदत निधीचे वाटप सौ.विखे यांचे हस्ते करण्यात आले.ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.तर पंधरावा वित्त आयोगांतर्ग महिला व बालकल्याण खर्चामधून १५ अंगणवाड्यांना सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची भांडी यावेळी वाटप करण्यात आली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ.विखे यावेळी म्हणाल्या की, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविताना समाजातील उपेक्षित, गरजूंना विविध प्रकारची मदत करण्याची परंपरा निर्माण झाली आहे.विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवताना प्रत्येकाचा विचार आपण करतो.शासनाचा निधी आणण्याचे काम आम्ही करीत असतो मात्र स्थानिक संस्थांनी तो गरजू पर्यंत पोहचण्यासाठी अधिक गतीने काम करण्याची गरज आहे.
यावेळी प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे,ट्रक्स वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी,बाजार समितीचे संचालक राहुल धावणे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे,सरपंच कल्पना मैड,उपसरपंच गणेश विखे,विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक धावणे,उपाध्यक्ष नाना म्हस्के,भागवतराव विखे,रंगनाथ विखे,वसंतराव विखे,ऍड.गोकुळ धावणे,विजयराव लगड,अनिल विखे,दिलीप विखे,भाऊसाहेब धावणे,प्रवीण विखे,रामभाऊ विखे,सिंधुताई म्हस्के,ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी अनिल विखे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमानंतर लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या प्रांगणात सौ.विखे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.