लोणी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेतक-यांनी भुमातेची काळजी घेतांना नैसर्गिक सेंद्रीय शेतीतून स्वता: निरोगी रहावे आणि इतरांनाही निरोगी ठेवावे असे आवाहन करतांनाच सेंद्रीय शेतीतून उपलब्ध होणाऱ्या शेतमालाची संघटीत होऊन मार्केटींग करुन स्वताः चा बॅन्ड निर्माण करा असे प्रतिपादन सेंद्रीय शेतीचे तज्ञ आणि कृषिभुषण सदुभाऊ शेळके यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे राहुरी आणि संगमनेर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत श्री.सदुभाऊ शेळके बोलत होते.राहुरीचे तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, मृद विज्ञान विभागाने शांताराम सोनवणे, पिकसंरक्षण विभागाचे भरत दंवगे विस्तार विभागाच्या प्रियंका खर्डे आदीसह संगमनेर आणि राहुरी येथील सेंद्रीय गटातील शेतकरी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात कृषिभुषण सदूभाऊ शेळके म्हणाले, सेंद्रीय शेतीला चालना देण्याचे मोठं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. शेतक-यांनी उत्पादन खर्च कमी करून जैविक आणि सेंद्रीय खतांच्या वापरांतून जमिनीची सुपिकता टिकावी. आज सेद्रीय उत्पादनाला मोठी मागणी आहे.संघटीत होऊन सेद्रीय शेती करा.असे सांगून विविध पिकांत केलेल्या सेंद्रीय शेतीची माहीती दिली.
दोन दिवसीय कार्यशाळेत बापुसाहेब शिंदे यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची माहीती दिली. शैलेश देशमुख यांनी केंद्रा मार्फत सुरु असलेल्या सेद्रीय शेतीच्या उपक्रमाची माहीती दिली. शांताराम सोनवणे यांनी सेंद्रीय खते, जैविक खते, स्लरी तंत्रज्ञानाची तर भरत दंवगे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये एकात्मिक आणि जैविक पध्दतीने पिकसंरक्षणांची माहीती दिली. सेंद्रीय मालाची विक्री आणि प्रामाणीकरण विषयी प्रशांत नाईकवाडी यांनी माहीती दिली. आभार विस्तार विभागाच्या प्रमुख प्रियंका खर्डे यांनी मानले.




