अमरावती (जनता आवाज वृत्तसेवा):- दोन दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारण वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातीवरून वादळ उठले आहे. शिंदे गटाने दिलेली जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नसल्यामुळे वादाला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे गटांनी दुसऱ्या दिवशी लगेच नवीन जाहिरात देऊन वाद संपवण्याचे चित्र उभे केले.भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आपली लायकी पाहून बोलले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीने बेडूक, मेंढक म्हणणे योग्य नाही, अशा शब्दांत प्रहारचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी सुनावले आहे.
‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, या जाहीरातीवरून सध्या शिंदे गट व भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यावरूनच बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही, अशी विखारी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली होती. त्याला बच्चू कडूंनी तिखट प्रत्युत्तर दिले आहे.
बच्चू कडू म्हणाले, बोंडेंसारख्या माणसाने आपली लायकी पाहून तरी बोलले पाहीजे. आपण कोणामुळे इथे आहोत?, याचा विचार केला पाहीजे. बोंडेंना कुठे तरी केंद्रात अडचण असेल म्हणून ते अशा पद्धतीने टीका करत असतील. आगामी निवडणुका भाजप व शिवसेना युतीने सोबत लढल्या पाहीजे, असे आमचे मत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात कुणी असे वक्तव्य करत असेल, मुख्यमंत्र्यांच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उठवत असेल तर ते चुकीचे आहे.
शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न
बच्चू कडू म्हणाले, भाजपवर नेहमी टीका केली जाते की, हा पक्ष सोबत असलेल्या इतर पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतो. भाजप खासदारांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या वक्तव्यालाही लोक अशाच पद्धतीने पाहतील. सोबत घेऊन शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?, एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा तर हा प्रकार नाही ना?, असा विचार लोक करू शकतात. त्याचा फटका भाजपलाच बसेल.
फडणवीस-शिंदेंची तुलना चुकीची
बच्चू कडू म्हणाले, मुळात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची तुलना होऊच शकत नाही. प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे बोंडेंचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंची तुलना करायला नको होती. मुळात हा लहान मुद्दा आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करून जो काही गैरसमज निर्माण झाला आहे, तो दूर करतील. अशावेळी बोंडेंसारख्या इतरांनी आग लावण्याचे कारण नाही.
जाहिरातीवरुन युतीत तणाव:बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या ‘महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खासदार अनिल बोंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही.
महाराष्ट्रातील सरकारने म्हणजे शिवसेना व भाजप युती सरकारने एकमेकाशी वाद न घालता सर्वसामान्य जनतेची प्रश्न कसे सोडवता येईल हे बघावे. अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.