सात्रळ दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):–लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक व कार्यालय प्रमुख ॲड. अनिल शहाजी गागरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार – २०२४ जाहीर झाल्याचे पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
ॲड. अनिल गागरे हे संस्थेच्या गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयात पंचवीस वर्षे कार्यरत होते. पदोन्नती होऊन सध्या ते सात्रळ महाविद्यालयात कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. सेवेत कार्यरत असताना त्यांनी एम.फिल., एम.बी.ए., एल.एल.बी. इत्यादी पदव्या त्यांनी प्राप्त केल्या असून महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवेतही प्रशंसनीय काम केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२४ या वर्षासाठी अहमदनगर जिल्हा वर्ग – ३ मधून गुणवंत शिक्षकेतर सेवक (महाविद्यालय) पुरस्कार या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रमाणपत्र, रु. ११,००० चा धनादेश व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठ वर्धापनाच्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे , शिक्षण संचालक डॉ. पी. एम. दिघे व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप व सर्व सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



