spot_img
spot_img

इंडिया आघाडीचा बेसुर आता समोर येवू लागला आहे, निवडणूकी पर्यंत इंडिया आघाडी टिकणार नाही. केवळ सत्‍तेसाठी एकत्र आलेल्‍यांना जनता थारा देणार नाही- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. २७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-केवळ व्‍यक्तिव्‍देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्‍यासाठी तयार झालेल्‍या इंडिया आघाडीचा बेसुर आता समोर येवू लागला आहे, निवडणूकी पर्यंत इंडिया आघाडी टिकणार नाही. केवळ सत्‍तेसाठी एकत्र आलेल्‍यांना जनता थारा देणार नाही. आगामी लोकसभा निवडणूकीत पुन्‍हा मोदींनाच पंतप्रधान करण्‍याचा निर्धार या देशातील जनतेने केला असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी नगरपंचायतीच्‍या वतीने शहरातील सुमारे १११ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या नागरी सत्‍कार समारंभात मंत्री विखे पाटील यांनी राज्‍यातील राजकारणावर भाष्‍य करुन, शिर्डी शहराच्‍या विकासाकरीता अधिकचा निधी उपलब्‍घ करुन देण्‍याची ग्‍वाही दिली. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास माजी नगराध्‍यक्ष कैलास कोते, अभय शेळके, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख कमलाकर कोते, सौ.अनिता जगताप, राष्‍ट्रवादीचे रमेश गोंदकर, शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, सोसायटीचे चेअरमन विलास गोंदकर, यांच्‍यासह सत्‍कार समितीचे सदस्‍य उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाचा अमृतकाळ सुरु आहे. देश विकासाच्‍या मार्गाने जात आहे. आयोध्‍येमधील प्रभू श्रीरामांच्‍या मंदिराचे निर्माण कार्य प्रधानमंत्र्यांमुळेच मार्गी लागले. एखाद्या कामाचा ध्‍यास घ्‍यायचा आणि ते पुर्ण करायचे ही ओळख या विश्‍वनेत्‍याची संपूर्ण जगात झाली असल्‍याने त्‍यांच्‍याच नेतृत्‍वाखाली समाजाचाही विकास होत आहे. मागील दहा वर्षे योजनांच्‍या माध्‍यमातून समाजाला सुरक्षा कवच देताना भ्रष्‍ट्राचाराचा एकही कलंक केंद्र सरकारवर नसल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून नगर जिल्‍ह्याच्‍या विकासाला निधीची उपलब्‍धता होत आहे. निळवंडे धरणाचा प्रश्‍न महायुती सरकारमुळे मार्गी लागला. दोन्‍हीही कालव्‍यांना पाणी देण्‍याचा शब्‍द आपण दिला होता, तो पुर्ण झाला आहे. या विषयाचे राजकारण झाले, कोणाला काय श्रेय घ्‍यायचे त्‍यांने जरुर घ्‍यावे, युती सरकारला फक्‍त शेतक-यांना पाणी द्यायचे होते.

शिर्डी आणि नगर येथील औद्योगिक वसाहतीला जागेची उपलब्‍धता करुन दिल्‍यामुळे रोजगाराचा प्रश्‍नही आता सुटणार आहे. अनेक उद्योजक या भागात येण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. शिर्डी येथे विमानतळ सुरु करण्‍यासाठी अनेक जणांनी विरोध केला होता परंतू या विमानतळाचे फायदे लोकांना आज समजले आहेत. भविष्‍यात या ठिकाणी अंतरराष्‍ट्रीय दर्जाचे क्रिडा संकुल उभारण्‍याची ग्‍वाही देतानाच शिर्डी हे तिर्थस्‍थान जगाच्‍या नकाशावर अधिक ठळकपणे उठून दिसण्‍यासाठी शहराच्‍या सुशोभिकरणाला प्राधान्‍य दिले जाणार असून, शिर्डीसह जिल्‍ह्यातील तिर्थक्षेत्रांच्‍या विकासासाठी स्‍वतंत्र आराखडा तयार करण्‍यात आला असून, या माध्‍यमातून नेवासा येथे ज्ञानेश्‍वर सृष्‍टीचाही समावेश करण्‍यात आल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

खंडकरी शेतक-यांचा लढा अनेक वर्षे चालला परंतू महायुती सरकारमुळेच या जमीनींचा प्रश्‍न निकाली लागला आहे. या शेतक-यांना त्‍यांच्‍या हक्‍काच्‍या जमीनी पुन्‍हा देतानाच या जमीनी वर्ग एक करण्‍यासाठी कोणताही मोबदला न घेण्‍याचा निर्णय देखील मंत्रीमंडळाने घेतल्‍याने या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे काम करण्‍याची संधी फक्‍त तुमच्‍या पाठबळामुळेच मिळाली. अनेक वर्षे सातत्‍याने मतदार संघातील जनता चांगले काम करण्‍यासाठी प्रेरणा देत आहे. राज्‍यात काम करीत असताना या मतदार संघातील जनतेला खाली पाहावे लागले नाही. असे काम करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. भविष्‍यातही हीच साथ सर्वांनी देण्‍याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, कैलास कोते, अभय शेळके, कमलाकर कोते, सचिन तांबे, रमेश गोंदकर, अनिता जगताप यांचीही भाषण झाली.

श्री.साईबाबा संस्‍थानमध्‍ये असलेल्‍या प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्‍णाच्‍या मुर्तींबाबत संस्‍थान पदाधिका-यांशी चर्चा करुन, ही दोन्‍हीही मंदिर उभारण्‍याबाबत लवकरच कार्यवाही करु. मंदिरासाठी जागेची उपलब्‍धता करुन देण्‍याची ग्‍वाही ही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!