कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- विज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली तरी आपली संस्कृती आजही चिरंतन असून हेच हिंदू संस्कृतीचे तेज चिरंतन टिकवून ठेवून दरवर्षी साजरा होणारा हळदी कुंकू कार्यक्रम संस्कृतीचे संवर्धन व विचारांची देवाण घेवाण असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा व गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मतदार संघातील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी महिलांशी हितगुज साधतांना सौ.पुष्पाताई काळे पुढे म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नेहमीच महिलांच्या कला गुणांना वाव दिला आहे. त्यामुळे ‘गोदाकाठ महोत्सव’, जागर स्त्री शक्तींचा ‘नवरात्र महोत्सव’ अशा विविध कार्यक्रमातून महिलांना सर्वांगीण सक्षम करून आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर्श जपतांना स्त्रीत्वाचा सोहळा असणारा हळदी-कुंकू कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. महिलांच्या जीवा-भावाचा, जिव्हाळ्याचा, आपलुकीचा अन् गोडव्याचा असणाऱ्या मकर संक्रात सणाचे महिला भगिनींमध्ये विशेष उत्साह व आनंद असतो. हा उत्साह व आनंद द्विगुणीत करण्यासाठी महिला भगिनींना हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला भगिनी आपली सुख-दु:ख वाटून घेवून प्रेम आणि मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबंध अधिक घट्ट करण्याचा उद्देश साधला जात असून हाच आपल्या भारतीय संस्कृतीचा मुलाधार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक महिला भगिनींशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांची विचारपूस केली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कोपरगाव शहर व तालुक्यातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.