पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्त अॅड. दीपलक्ष्मी म्हसे या होत्या. कवी इंद्रजित भालेराव पुढे म्हणाले, महाविद्यालयाचे वातावरण निसर्गरम्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालय व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळत असते. सर्व क्षेत्रात काम करण्याच्या खूप संधी आहेत. फक्त आपल्या क्षमतांना सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. जीवनात कितीही यश मिळाले तरीसुद्धा कुटुंब व गुरुजनांना विसरू नका. कवी हा जीवनातील अनुभवांचे अवलोकन करत असतो त्यातूनच कविता आकार घेते. कवितेमुळे कवीला कवीपण प्राप्त होते. अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या विश्वस्त ॲड. दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या, पारनेर महाविद्यालयाला नॅकचे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य या सर्व घटकांचे योगदान आहे. महाविद्यालयात संपन्न होत असलेले पारितोषिक वितरण समारंभ हा शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी संस्था सर्वतोपरी पाठीशी आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना फक्त पदवी मिळविणे इतका संकुचित विचार न करता आपल्या स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे व त्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे यादृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणारे केंद्र म्हणून पारनेर महाविद्यालय कार्यरत आहे. येथील सर्व तज्ज्ञ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
संस्थेच्या सदस्य निर्मलाताई काटे म्हणाल्या, नोकरी मिळविण्याच्या हेतूने शिक्षण घेणे हा संकुचित दृष्टिकोन आहे. अर्थार्जन हा ज्ञानार्जनाचा मार्ग असू शकत नाही. तर एक आदर्श नागरिक म्हणून समाजात ओळख निर्माण करणारे विद्यार्थी महाविद्यालय घडवत आहे. अशा शब्दात महाविद्यालयाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या समृद्ध वाटचालीचा आढावा घेऊन कार्यक्रमाचा हेतू सांगितला.
या स्नेहसंमेलनप्रसंगी कार्याध्यक्ष डॉ. भीमराज काकडे यांनी अहवाल वाचन केले. तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्राध्यापकांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दलही प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध शिवशाहीर कल्याण काळे यांनी पोवाडा सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. तुकाराम थोपटे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संजय गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. संजय कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक सावकार काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलन प्रसंगी प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, डॉ. युवराज वाघिरे, प्रा. रमेश खराडे, प्रा. रणजित शिदे, प्रा. सरीता कुंडलीकर, प्रा. चैताली मते, प्रा. महेश आहेर यांनी खाद्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. तर डॉ. संजय गायकवाड, प्रा. गंगाराम खोडदे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. भरत डगळे, यांनी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. तर पारंपरिक वेशभूषा दिनाचे प्रा. नितीन निपुंगे, प्रा. महेश आहेर, प्रा. तुषार गालबोटे, प्रा. दुधाडे, प्रा. ठुबे यांनी आयोजन केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल आठरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक शिंदे, डॉ. हरेश शेळके व डॉ. माया लहारे यांनी केले.