लोणी दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री वरद विनायक सेवाधाम, लोणी (ता. राहाता) येथे ता. १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत श्री गणेश जयंती निमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन सेवाधामचे संस्थापक महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सप्ताहाचे हे अकरावे वर्ष असून शनीवार दि १० फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता सप्ताहाचे कलश पुजन आणि ध्वजारोहण महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
सप्ताह कालावधीत अनुक्रमे भागवताचार्य भगिरथ काळे, (सिन्नर), रोहीणीताई परांजपे (पुणे), ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकीकर), मृदुगंमहर्षी युवराज महाराज देशमुख (आळंदी), जगन्नाथ महाराज पाटील (शहापूर), नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव) या ज्ञानवंत महंतांची अनुक्रमे सकाळी साडेदहा ते बारा आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तरूपी सेवा होणार आहे. तसेच दूपारी २ ते ५ या वेळेत परीसरातील भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम होतील. दुपारी साडेबारा ते दोन आणि रात्री नऊ वाजता सर्व भाविकांना भोजनप्रसादाचे आयोजन केले आहे.
सप्ताह काळात सकाळी सहा ते आठ काकड आरती, सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत स्तोत्र पठण व गीतापाठ, सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरीपाठ होणार आहे.
मंगळवार दि. १३ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्री वरद विनायक सेवाधामचे संस्थापक उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे काल्याचे किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी श्री गणेश जयंती निमित्त या गणपती किर्तन महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेवाधाम परीवारातर्फे करण्यात आले आहे.