बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- येथील दिघी रस्ता परिसरातील टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे होणाऱ्या प्रदूषणाची झळ पोहचलेल्या ग्रामस्थांनी नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी श्रीरामपूरातील म.गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीजच्या कारखान्याचे बेलापूर शिवारातील दिघी रस्ता परिसरात स्पेंट वाॕशचे खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये रसायनयुक्त स्पेंटवाॕश सोडून साठविला जातो. या खड्ड्यांत साठलेला स्पेंटवाॕश जमिनीत जिरुन आसपासच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या विहिरी, बोअरवेल, शेत जमिनीत पसरतो. यामुळे बेलापूर येथील दिघी रस्ता, खोसरं, कु-हे वस्ती आदी परिसरात प्रदुषणाचे संकट निर्माण झाले आहे.
या स्पेंटवाॕशमुळे विहिरी, बोआरवेलचे पाणी दुषित झाले आहे. जमिनीही प्रदूषित झाल्याने उत्पादकता घटली आहे. दुषित पाणी पिल्याने माणसे विशेषतः वृध्द व मुले तसेच जनावरे विविध आजारांना बळी पडत आहेत. प्रदूषित चारा पाण्याने जनावरे मृत्युमुखी पडून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या पन्नास वर्षांपासूनची प्रदुषणाची ही समस्या आहे. तथापि टिळकनगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापन याप्रश्नी बेफीकीर आहे. वास्तविक या इंडस्ट्रीने एन्फ्ल्युएंट प्लॕट कार्यान्वित करुन झिरो पोल्युशन करावे यासाठी पर्यवरण विभागाने सक्ती केली पाहिजे. तसेच इ.टी.पी. ची यंञणा न उभारल्यास या इंडस्ट्रीचा परवाना रद्द केला पाहिजे. प्रदुषणग्रस्त अनेक वर्षांपासून याबाबत आवाज उठवित आहेत, पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. आता शेतकऱ्यांचा व प्रदूषणग्रस्तांचा संयम संपला असून प्रदूषणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच प्रदुषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आदि मागणीसाठी प्रदुषणग्रस्तांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.