निमगावखैरी( जनता आवाज वृत्तसेवा ): – महिलांना बचत गटाच्या माध्यमातून विविध गृहउद्योग व व्यवसाय सुरु करता येवू शकतात. त्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सहकार्याने अर्थसहाय्य उपलब्ध करता येईल. तेव्हा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जन करुन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी केले.
निमगावखैरी येथील वाघाई माता ग्रामसंघ व महिला बचत गट आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सौ.मुरकुटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच दत्ताञय झुराळे होते. यावेळी पं.समितीच्या श्रीमती गायकवाड, मुळे मॕडम, डांगे सर आदी उपस्थित होते.
सौ.मुरकुटे म्हणाल्या की, महिलांनी चूल आणि मुल या मानसिकतेतून बाहेर पडून स्वावलंबी बनले पाहिजे. सामाजिक क्षेञात कार्यरत झाले पाहिजे. महिलांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक घरगुती उद्योग व व्यवसाय सुरु करुन अर्थार्जन करता येवू शकते. यासाठी जिल्हा सहकारी बँक अर्थसहाय्य करते. असे अर्थसहाय्य मिळवून देणेसाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सहकार्य घेवू. प्रत्येक कुटुंबातील किमान एक महिला बचत गटाची सदस्य असावी, असे त्या म्हणाल्या.
सौ.संगीता काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास उपसरपंच विजय परदेशी, ग्रामसंघाच्या अध्यक्ष वंदना तांबे, दिपकराव झुराळे, अमोल कालंगडे, किशोर काळे, कोमल परदेशी, पुजा कालंगडे, वैशाली परदेशी, संगीता पोकळे, कविता निमसे यांचेसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.