डोंबिवली (जनता आवाज वृत्तसेवा):- डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्राथमिक शाळेत आनंदमेळा उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.डोंबिवली येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेचा इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी आनंदमेळा शाळेच्या प्रांगणात आयोजित केला होता. सकाळी बरोबर ८ .३० वाजता संस्थेचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. विद्याधर शास्त्री सर, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मा. सौ. भावना राठोड यांच्या हस्ते आनंदमेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मा. शास्त्री सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन भेट दिली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेतले. त्यांच्या पदार्थांची प्रती प्लेट किंमत विचारली आणि सरांनी स्वतः पैसे देऊन विद्यार्थ्यांकडून पदार्थ आणि वस्तू विकत घेतल्या. हातावर टॅट्टयूही काढून घेतला.
पाणीपुरी, शेवपुरी, ओली-सुकी भेळ, चायनीजभेळ, मंच्युरियन, मोमोज, चॉकलेट्स, सरबत, रव्याचे लाडू, सामोसे, पावभाजी, वडापाव, पॅटीस, सँडविच इ. अशा अनेक खमंग पदार्थांच्या वासाने शाळेचा संपूर्ण परिसर आणि आसमंत भरून गेला होता. मुले आनंदाने इकडे तिकडे बागडत होती. मोठ्या आवडीने आणि चवीने पदार्थ खात होती. हातावर टॅट्टयू काढून घेत होती. रंगीत खोडरबर, पेन,कानातले, बांगडी इ. आकर्षक वस्तूंची खरेदी करत होती. आणि विक्री करणारे विद्यार्थी आपल्या स्टॉलकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेत होते. विद्यार्थ्यांची पदार्थ देताना, पैसे घेताना थोडी तारांबळ उडत होती, पण त्यातही एक वेगळा आनंद सामावलेला होता.
शाळेचे शालेय समिती सदस्य मा.श्री.दांडेकर सरांनी आनंद मेळ्याला भेट देवून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. खरंच आजचा आनंदमेळा हा आनंदाने, हर्ष-उल्हासाने काठोकाठ भरलेला होता. सौ. सुजाता औटी यांचे सुरेख फलक लेखन, श्री. सरनोबत सरांनी बनवलेला पदार्थांचा सुंदर फ्लेक्स. डोरेमॉन, मँगो, स्ट्रॉबेरी यांचे कपडे परिधान केलेले विद्यार्थी आनंदमेळ्याचे खास आकर्षण ठरले. आजचा आनंदमेळा हा श्री. माळी सर, श्री. हुलवळे सर, श्री. मोंडे सर आणि शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. भावना राठोड आणि सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी व पालक वर्ग यांच्या नियोजनाखाली संपन्न झाला.