14.8 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

भगवतीपूरमध्ये बिबट्याला चाबकाने फटकारले म्हणून प्राण वाचले

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- ऊसतोडीसाठी शेताच्या दिशेने ऊसतोडणी कामगार बैलगाडीतून चालले होते. बैलगाडीत गाडीवानाची पत्नी झोपलेली होती. अचानक एक बिबट्या त्या महिलेकडे झेप घेत हल्ला करण्याच्या तयारीत होता. प्रसंगावधान राखून गाडीवानाने तात्काळ हातातील चाबकाने बिबट्याला फटकावले. आरडाओरड केला. आजूबाजूच्या लोकांनी त्या दिशेने धाव घेतली. आणि बिबट्याने पळ काढला. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. भगवतीपूर शिवारात ही घटना घडली.

३ – ४ दिवसांपूर्वी भगवतीपूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सध्या ठिकठिकाणी ऊसतोडणी सुरू आहे. पाच मोऱ्याकडून रामपूर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने ऊसतोडणी कामगार बैलगाडीतून चालले होते. ऊसाचे शेत अजून लांब आहे म्हणून ऊसतोड करणारी महिला बैलगाडीत झोपली होती. तिचा पती बैलगाडी हाकत होता. अशातच रस्त्याकडेला बिबट्या दबा धरून बसलेला होता. बिबट्या गाडीत झेप घेऊन हल्ला करण्याच्या पवित्र्यात असतानाच गाडीवानाने तात्काळ आपल्या हातातील चाबकाने बिबट्याला फटकारायला सुरुवात केली. आरडाओरड केली. पहाटेच्या वेळी गुराढूरांचा चारापाणी करण्यासाठी शेतकरी उठलेले होते. आसपासच्या लोकांनी हा आवाज ऐकला. त्यांनी त्यदिशेने धाव घेतली आणि आरडाओरड करीत बिबट्याला पिटाळून लावले. दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून महिला बचावली.

लोणी, सादतपूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलांना प्राण गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असतांना भगवतीपूरमध्ये हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी कडसकर वस्तीवर रात्री स्वप्निल कडसकर यांच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला केला होता. सुदैवाने त्यात ते थोडक्यात बचावले. कोल्हार भगवतीपूर परिसरात ठीकठिकाणी शेतामध्ये तसेच रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करण्याचे प्रकारही दररोज घडत आहेत. अशातच आता नरभक्षक बनलेल्या बिबट्यांचे माणसांवर हल्ले होऊ लागले आहेत ही बाब चिंताजनक आहे.

ठीकठिकाणी ऊस तोडणी सुरू असल्याने ऊसातून बिबटे बाहेर पडत आहेत. बिबट्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. सगळीकडेच बिबट्याचा संचार वाढलेला असल्याने पिंजरे लावायचे तरी कोठे ? आणि किती ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही बिबट्यांचा मानवी वसाहतीतील वाढलेला संचार आणि माणसांवर होत असलेले हल्ले या बाबी भीतीदायक आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!