लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोणी सारख्या खेडेगावात पद्मश्री व पद्मभूषण या दोन अमुल्य पदवी प्राप्त असलेल्या सहकार धूरीनांची ही अलौकीक भूमी आहे. यांच्या कार्यकर्तृत्वाने ही प्रवरेची माती तावून सुलाखून निघालेली आहे. प्रवरेची माती परीस आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सोने होते. प्रवरेत काम करताना प्रत्येक कार्याचा उत्तम अनुभव मिळत असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील शासकिय तंत्रनिकेतनचे स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. के.बी.लढाने यांनी केले.
पद्मश्री डॉ. विखे पाटील पॉलिटेक्निक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योजक शैलेन्द्र पांडे, प्राचार्य डॉ. विजय राठी, प्रा. संदीप गोर्डे, संगणक विभाग प्रमुख प्रा. रवींद्र काकडे, प्रा. राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्थापत्य विभागाच्या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत अमृतवाहीनी प़ॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपयांचे प्रथम बक्षिस, एच.एच.जे.बी. चांदवड पॉलिटेक्निक दहा हजार रूपयांचे द्वितीय बक्षिस, तर संजिवनी प़लिटेक्निक आणि विखे पाटील पॉलिटेक्निक, लोणी यांना विभागुण तृतिय बक्षिसाचे मानकरी ठरले आहे.
डॉ. राठी म्हणाले की, प्रवरा ही शिक्षण क्षेत्रातील कार्यशाळा ठरली आहे. प्रवरेत सातत्याने विद्यार्थी केंद्रीभूत नवनवीन प्रयोग राबवले जातात. याचा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा पगडा असून प्रवरा नेहमीच इतरांना मार्गदर्शी संस्था ठरत आलेली आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदनाखाली प्रवरा शैक्षणिक संस्था ही दर्जेदार संस्था म्हणून कायमच सर्वात पुढे राहीली असल्याचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,मंञी माजी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.




