राहुरी दि.,१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहूरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादीत केलेल्या जमिनीमुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई मंत्रालय दालनात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासवेत विशेष बैठक बोलावत त्यांनी भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांचे पालन करून भरती प्रकिया ठराविक कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी राहुरी कृषी विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीतील उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या भरती बाबत बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनुप कुमार, कृषी परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भांगडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राहुरी येथील प्रकल्पाच्या भरतीच्या बाबत सखोल चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यात यावा अशा सुचना महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. मदत व पुनर्वसन, कृषी आणि महसूल विभागाने तत्परतेने ठराविक कालावधीमध्ये भरती प्रक्रिया राबवून ही भरती पूर्ण करावी असे विखे पाटील म्हणाले. प्रकल्पग्रस्तांना आपली सहानभुती असून ह्या प्रकरणी शासनाकडून कोणतीही दिरंगाई न करता, कमीत कमी वेळेत ही भरती पूर्ण करावी असे कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.