कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील काही तरुणांनी एकत्रित येऊन गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करीत अनोखा उपक्रम राबविला.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पाथरे बुद्रुक गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र शिवजयंतीच्या निमित्ताने एखादा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा मानस येथील काही तरुणांनी आपापसामध्ये व्यक्त केला. यावर २५ – ३० युवक एकत्र येत येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने स्वयंस्फूर्तीने परस्परांमध्ये रक्कम संकलित करण्यात आली. जमा झालेल्या या रकमेचा वापर करून स्मशानभूमीमध्ये आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली.
पाथरे बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये प्रथमतः साफसफाई करण्यात आली. लोकांना बसण्याकरिता १९ सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले. याशिवाय स्मशानभूमीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. त्याचबरोबर लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एकप्रकारे येथील स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आला.
स्मशानभूमीचे रुपडे पालटल्याचे समाधान या युवकांच्या चेहऱ्यावर दिसू लागले. त्याचबरोबर शिवजयंती निमित्ताने आपण एक आदर्श समाजोपयोगी उपक्रम राबवू शकलो याचा आनंदही व्यक्त करण्यात आला. गावातील तरूणांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.