करंजी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे.
नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरुपी कायापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.