कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा संचार वाढत आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांना बिबट्याने आपले भक्ष्य बनवले असून अशा परिस्थितीत महावितरणकडून शेती पंपासाठी रात्रीच्या वेळी विज उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे जीव धोक्यात घालून शेतीला पाणी भरण्याची वेळ येते. शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय शिरसाठ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी कोल्हार खुर्द येथील महावितरणच्या कार्यालयात कानिष्ठ अभियंता दिलीप गाडे यांना निवेदन दिले.
कोल्हार खुर्द परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत आहे. जाधव वस्ती, शिरसाठ वस्ती, कोंबडवाडी, पाटिलवाडी अशा अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्र्यांसह,शेळ्या, कोंबड्या, कालवडी अशा प्राण्यांना आपले भक्ष्य बनवले आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे.
अशातच गेल्या महिनाभरापूर्वी लोणी आणि सादतपूर परिसरात बिबट्याने दोन लहान मुलांना शिकार बनवले आहे. त्यामुळे हे बिबटे आता नरभक्षक होत असल्याचे दिसत आहे. अशावेळी गेल्या आठ दिवसापासून जाधव वस्ती परिसरात संध्याकाळी ८ वाजता शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे वाडया – वस्त्यावरील शेतकरी, ग्रामस्थाना संध्याकाळी सातच्या आत घरात राहण्याची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत महावितरणकडून शेती पंपासाठी रात्रीच्या वेळी विजपुरवठा दिला जातो. या वेळेत शेतीला पाणी भरत असताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून पिकांना पाणी द्यावे लागतं असल्यामुळे गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेत कनिष्ठ अभियंता श्री. गाडे यांना निवेदन देत शेतीसाठी दिवसा विज पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय शिरसाठ, रजाक कादर, मच्छिंद्र जाधव, अशोक जाधव, रोहित घोगरे, निकेतन पानसरे, रवींद्र शिरसाठ, सतीश शिरसाठ, जालिंदर शिरसाठ, सुजित शिंदे, राजेंद्र शिरसाठ, अशोक शिरसाठ यांनी केली आहे.