संगमनेर,( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर शहर आणि तालुक्यातील २२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेतून जेष्ठ नागरीकांना तसेच दिव्यांग व्यक्तिंना मंजुर झालेल्या साधन साहित्यांचे वितरण महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालपाणी लॉन्समध्ये दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साधन साहित्याचे विरतण करण्यात येणार आहे. यापुर्वीही तालुक्यातील जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचा लाभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. वयोश्री योजने बरोबरच दिव्यांग व्यक्तिंनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुर झालेले साधन साहित्य या कार्यक्रमात वितरीत करण्यात येणार आहे.
शहरातील म्हाळुंगी नदीवरील पुलाकरीता पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या पुलाचा भूमीपुजन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून, शहरामध्ये विकसीत करण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुमारे ४ कोटी २५ लाख रुपयांच्या इमारतीचा उद्घाटन सोहळाही संपन्न होणार आहे.
तालुक्यातील निमगाव, भोजापूर येथील पुलाच्या कामांकरीताही मंत्री विखे पाटील यांनी ३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. या पुलाच्या कामाचे भूमिपुजनही विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. या पुलाचे काम मार्गी लागत असल्यामुळे निमगाव, भोजापूर, जवळे कडलग, सायखिंडी या गावातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुरण येथेही विविध विकास कामांच्या शुभारंभास मंत्री विखे पाटील उपस्थित राहणार असून, या संपूर्ण कार्यक्रमाला नागरीक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.